अत्यावश्यक कारणाच्या नावाखाली भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:48 AM2021-04-30T04:48:46+5:302021-04-30T04:48:46+5:30
गत महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पर्याय राबविले जात ...
गत महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध पर्याय राबविले जात आहेत. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने राज्यात विविध निर्बंध लादले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकांनाच्या वेळेत बदल केले असून सकाळी सात ते अकरा अशी वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच शहरात विविध ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होणे नित्याचीच बाब बनली आहे. अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत होते. मुख्य भाजी मंडई बंद असली तरी मंडई परिसर, चांभार गल्ली, श्री चेंबर्स, प्रभात टॉकीज परिसर, कृष्णा नाका, गुजर हॉस्पिटल परिसर, मार्केट यार्ड रोड परिसरात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी नागरिकांची सध्या गर्दी होत आहे.
शहरातील विविध चौकांत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीचालकांच्या गाड्या वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्या तरी अनेकांची भटकंती अद्याप थांबलेली नाही. किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडणारे अद्यापही थांबलेले नाहीत. त्यांना कोरोनाचे आणि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे अद्यापही गांभीर्य नसल्याची परिस्थिती आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांसाठी वेळ असूनही त्यानंतर अनेकजण घराबाहेर पडत आहेत.