पावसाळा संपताच वांग-मराठवाडीत ठणठणाट!

By admin | Published: September 9, 2016 11:31 PM2016-09-09T23:31:25+5:302016-09-10T00:39:21+5:30

दरवाजे उघडे ठेवल्याचा परिणाम : धरणात अत्यल्प पाणीसाठा; उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची भीती

Wang-Marathwadi settlement ends in rainy season! | पावसाळा संपताच वांग-मराठवाडीत ठणठणाट!

पावसाळा संपताच वांग-मराठवाडीत ठणठणाट!

Next

सणबूर : पाटण तालुक्यातील वांग-मराठवाडी धरणाचे गेट खुले ठेवल्याने धरणातील पाणी थेट नदी पात्रामध्ये निघून गेले असून, धरणातील पाणी पातळीने तळ गाठला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने परतीच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे चित्र असून, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण आहे.
वांग-मराठवाडी धरण प्रकल्पाची अवस्था ‘आंदळ दळतंय आणी कुत्रं पिठ खातंय,’ अशीच दिसत आहे. १८ वर्षांपासून या धरणाचा वनवास अजूनही संपलेला नाही. कधी निधीचा तुटवडा कधी धरणग्रस्तांची आंदोलने यामध्ये धरणाचे काम आजही अपूर्णच आहे.
चार-चार वर्षांपासून धरण व्यवस्थापनाने थोडा फार पाणी साठा करण्यास सुरुवात केल्याने याचा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना झाला आहे. गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा संपूर्ण राज्याला सोसाव्या लागल्या होत्या. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक गावांमध्ये ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अशावेळी धरणातून वाहणाऱ्या वांग नदी काठच्या गावांना धरणाच्या पाण्याचा मोठा फायदा झाला होता.
चालूवर्षी पाऊस समाधानकारक पडला असला तरी गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, दुसरीकडे विभागातील वांग-मराठवाडी धरण पावसाळ्यातच कोरडे पडत चालले आहे. धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला असून, धरणातील पाण्याची नासाडी सुरू आहे.
कृष्णा खोरे विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी दुष्काळाचा सामना करत असताना रेल्वेने व टँकरने पाणीपुरवठा करून दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये पाण्यावर व चारा छावण्यांवर खर्च करत होते. दुसरीकडे शासन पाणी अडवण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रम राबवत आहे. मात्र वांग-मराठवाडी धरणाच्या पाण्याची अक्षरश: नासाडी सुरू आहे.
याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा
आरोप शेतकरी करत आहेत. सध्या वांग-मराठवाडी जलाशयाने तळ गाठला असून, धरणात अती अल्प पाणीसाठा दिसून येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर विभागातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा
लागेल. (प्रतिनिधी)


‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ला अक्षता....
शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार सुरू असून, शासनाने या सर्व बाबींचा विचार करायला हवा. वांग-मराठवाडी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन व्हायला हवे. अन्यथा ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा लाभ क्षेत्रातील जनतेला सोसाव्या लागल्या तर आश्चर्य वाटायला नको. पावसाळा संपताच धरणातील पाण्याने तळ गाठला असून ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.

वांग-मराठवाडी धरणातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. हे त्वरित थांबले पाहिजे नाहीतर गतवर्षीपेक्षा मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.
- हिंदुराव पाटील,
प्रांतिक प्रतिनिधी काँग्रेस
दुष्काळी गावांना टँकरने व रेल्वेने पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करत आहे. मात्र, येथे धरणातील पाण्याची नियोजनाअभावी नासाडी सुरू असून, संबंधित विभागने याचा गांभीर्याने विचार करावा.
- जगन्नाथ विभुते,
धरणग्रस्त प्रतिनिधी

Web Title: Wang-Marathwadi settlement ends in rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.