नगरसेवक व्हायचंय? मग थकबाकी भरा!

By admin | Published: November 1, 2016 11:58 PM2016-11-01T23:58:51+5:302016-11-01T23:58:51+5:30

कऱ्हाड पालिका : वसुलीसाठी प्रशासनाची शक्कल; अवघ्या सहा दिवसांत ६७ लाख जमा; करवसुली विभागाची ‘दिवाळी’

Want to be a corporator? Then fill up the dues! | नगरसेवक व्हायचंय? मग थकबाकी भरा!

नगरसेवक व्हायचंय? मग थकबाकी भरा!

Next

कऱ्हाड : पालिकेतील राजकारणी मंडळींच्यामुळे वर्षानुवर्षे पालिकेचा संपूर्ण कर भरण्याची चुकवेगिरी करणाऱ्या थकबाकीदारांना मात्र, पालिका प्रशासनाच्या नामी शक्कलीपुढे नमावे लागले. पालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आलेल्या व वर्षभर कर थकविणाऱ्या थकबाकी इच्छुकांना निवडणूक लढवायची असेल तर अगोदर थकबाकी भरा! असा नियम पालिका प्रशासनाने केल्याने तब्बल ६७ लाख २९ हजार ९३८ रुपये इतकी थकबाकीची रक्कम वसूल झाली.
वर्षानुवर्षे पालिकेचा कर थकवत आलेल्या थकबाकीधारकांकडून तो वसूल करण्यासाठी पालिकेने अनेक उपायही अवलंबिले. त्यातील काही उपाय यशस्वीही ठरले. मात्र, वसुलीची मुदत संपल्यानंतर पुन्हा करवसुलीची मोहीम थंड पडली. त्यानंतर पालिका निवडणूक लागल्याने निवडणुकीच्या कामात सर्व कर्मचारी व्यस्त झाले. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने नागरिक व इच्छुक उमेदवार पुन्हा पालिकेत येणार असल्याचे लक्षात घेत त्यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या कालावधीत करवसुली विभाग चालू ठेवत पालिका प्रशासनाने इच्छुकांकडून उमेदवारी अर्जावर ना हरकत घेण्यासाठी लागणाऱ्या सह्यांपैकी संबंधित करवसुली प्रमुखाची सही बंधनकारक केली. त्यामुळे इच्छुकांकडूनही तत्काळ थकबाकी रक्कम भरली गेली. पालिका प्रशासनाने निवडणूक अर्ज भरण्याच्या कालावधीत लढविलेल्या या नामी शक्कलीमुळे आता तब्बल ६७ लाख २९ हजार ९३८ रुपयांची वसुली पालिकेकडे प्राप्त झाली.
नव्वद टक्के करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेकडून ना ना तऱ्हेचे प्रयत्न करण्यात आले. पालिकेतील करवसुली प्रमुख व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर केलेल्या वसुलीच्या कारवाईतून तब्बल बारा कोटी थकबाकीची रक्कम पालिकेला जमा करता आली. त्यानंतर आता सहा दिवसांत तब्बल ६७ लाख २९ हजार ९३८ रुपये इतकी थकबाकीची रक्कम वसूल झाली.
पालिकेच्या करवसुली विभागाने निवडणुकीत अर्ज भरण्याच्या कालावधीत केलेल्या वसुलीमध्ये करवसुली ५४ लाख ९५ हजार ९१४ रुपये तर शॉपिंग सेंटरकडून केलेली वसुली ६ लाख ४२ हजार ७४ रुपये, घरगुती पाणीमीटर वसुली ५ लाख ९१ हजार ९५० रुपये अशी एकूण ६७ लाख २९ हजार ९२८ रुपये करवसुली पालिकेस प्राप्त झाली आहे. थकबाकी भरणाऱ्या संबंधित १ हजार ९९५ जणांना पालिकेने ना हकरत प्रमाणपत्रेही दिली आहे.
कऱ्हाड शहरासह वाढीव हद्दीतील थकबाकीधारकांनी आपली संकलित कराची रक्कम भरावी यासाठी पालिकेने शहरात थकबाकीधारकांच्या नावाचे फलकही लावले. तसेच त्यांच्या घरापुढे बँडपथकही वाजविले. त्यावेळी शहरासह वाढील हद्दीतील ६ हजार ११६ थकबाकीदारांपैकी निम्म्यांहून अधिक थकबाकीदारांनी संकलित कराची रक्कम पालिकेत भरली. तसेच कराची रक्कम न भरणाऱ्यांवर पालिकेकडून कडक कारवाईही करण्यात आली. यातील काही दुकानगाळेधारकांवर व घरगुती थकबाकीदारांवर जप्तीची करवाई केली करण्यात आली. या कारवाईसाठी शहरातील प्रत्येक प्रभागात सात अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून टीम तयार करण्यात आली होती.
अनेक वर्षांपासून पालिकेच्या अनेक सुविधांचा वापर करणाऱ्या थकबाकीधारक तसेच गाळेधारकांकडून पालिका निवडणुकीच्यानिमित्ताने करवसुली करण्याचा पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी निर्णय घेतल्यामुळे संबंधित थकबाकीची रक्कम वसूल करता आली. पालिका प्रशासनाने उमेदवार अर्ज भरणीच्या काळामध्ये करवसूली भरण्याबाबत केलेल्या कडक नियमांमुळे अनेक थकबाकीधारक इच्छुक उमेदवारांनीही तत्काळ थकबाकी रक्कम भरली. (प्रतिनिधी)
करवसुलीसाठी पालिकेत स्वतंत्र दोन विभाग
शहरात संकलित कराची रक्कम थकविणाऱ्या थकबाकीदारांकडून तसेच इच्छुक उमेदवारांकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी भरल्या जाणाऱ्या थकबाकीच्या रक्कमेची वसुली करण्यासाठी पालिकेत मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर दोन स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आले होते. त्या विभागात सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांकडून थकबाकीची वसुली केली जात होती.
 

Web Title: Want to be a corporator? Then fill up the dues!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.