इच्छुकांची ‘फॉर्मबाजी’ पाऊण कोटीची!
By admin | Published: January 27, 2017 11:20 PM2017-01-27T23:20:43+5:302017-01-27T23:20:43+5:30
सारेच पक्ष मालामाल : ‘आगामी निवडणुकीचं बजेट’ कल्पनेच्या पलीकडे जाणार
सातारा : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडे फॉर्म भरण्यासाठी गर्दी वाढत असल्याने राजकीय पक्षांनी पक्षनिधी घेण्यास सुरुवात केली आहे. या ‘फॉर्मबाजी’मुळे तब्बल पाऊण कोटीची कमाई झाली आहे. यामुळे सारेच पक्ष मालामाल झाले
असून आगामी निवडणुकीचं
बजेट कल्पनेच्या पलीकडे
जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादीने मुलाखत देणाऱ्या इच्छुकांकडून ३ हजारांपासून १५ हजार रुपयांपर्यंत पक्षनिधी घेतला. काँगे्रसने प्रत्येकी ५ हजार रुपये, भाजपने प्रत्येकी ५०० रुपये घेऊन सदस्यपद बहाल केले. तर शिवसेनेने अवघ्या ५ रुपयांच्या बदल्यात ६१५ जणांना शिवसेनेचे सदस्य करून घेतले. भाजप व शिवसेनेची केंद्र व राज्यात सत्ता आहे; परंतु दक्षिण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या दोन्ही पक्षांना प्रवेश करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. याउलट दोन्ही काँगे्रसचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाशवी वर्चस्व आहे. साहजिकच इच्छुक मंडळींनी राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन पक्षांचा पर्याय शोधला आहे. या दोन्ही पक्षांनी मोठा पक्षनिधी घेऊन संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
मात्र, उमेदवारी नाकारली गेल्यास हीच मंडळी भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे अजून दोन्ही काँगे्रसने उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नाहीत. सदाभाऊ खोत यांच्याकडे साताऱ्याचे सहपालकमंत्रिपद आल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भलतेच चैतन्य असून फलटण, कोरेगाव, माण व खटाव या तालुक्यांवर या पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.
‘राजकारणाचं पीक’ जोमाने वाढविणाऱ्या सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे जोरदार दंगल सुरू झाली आहे. बैठका, मेळावे, पक्षप्रवेश यांनी भलतेच रान उठले आहे. कालचा मित्र आज शत्रू झाला. तर कालचा शत्रू आज मित्र झाला आहे. सर्वच पक्षांमध्ये भलतेच अविश्वासाचे वातावरण तयार झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या ६४ व ११ पंचायत समित्यांच्या १२८ जागांसाठी पुढच्या महिन्यात (दि. २१ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. बालेकिल्ला टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा कस लागला आहे. काँगे्रस आपले आहे ते अस्तित्व टिकवून ठेवत आहे, त्या जागांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजप शतप्रतिशतची घोषणा देत निवडणुकीत उतरली आहे. शिवसेनेने धनुष्यबाण ताणला आहे. सहपालकमंत्रिपद मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बाळसे धरले आहे. (प्रतिनिधी)
खासदार उदयनराजेंच्या राजधानी एक्स्प्रेसचा धडकाउदयनराजे भोसले यांच्या राजधानी सातारा एक्स्प्रेसने मुख्यत: राष्ट्रवादीला जोरदार धडक दिली आहे. भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशीही उदयनराजेंनी चर्चा केली. मात्र, त्यांची व्यूहरचना अद्याप गुलदस्त्यात आहे.
अबब.. लाखांमध्येच आकडे !
राष्ट्रवादी : ७८० इच्छुकांकडून सरासरी ३९ लाख
काँगे्रस : ६०० इच्छुकांकडून सरासरी ३० लाख
भाजप : ३०० इच्छुकांकडून सरासरी १ लाख ५० हजार
शिवसेना : ६१५ इच्छुकांकडून ३ हजार ८०