युवकांच्या मारामारीत तलवारीने वार

By admin | Published: February 4, 2016 01:08 AM2016-02-04T01:08:33+5:302016-02-04T01:09:21+5:30

सैदापुरातील घटना : एकजण गंभीर; सहा जणांवर गुन्हा

War with sword by the youth | युवकांच्या मारामारीत तलवारीने वार

युवकांच्या मारामारीत तलवारीने वार

Next

कऱ्हाड : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून युवकांच्या दोन गटांत धुमश्चक्री उडाली. यावेळी एकावर तलवारीने वार करण्यात आले. सैदापूर, ता. कऱ्हाड येथे महाविद्यालय परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, दोन्ही गटांतील सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कृष्णत उत्तम जाधव (वय ४६, रा. बनवडी कॉलनी, सैदापूर) असे तलवार हल्ल्यातील गंभीर जखमीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथील विद्यानगरमध्ये काही मुलांची भांडणे झाली होती. ही भांडणे सामंजस्याने सोडविण्यासाठी मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास युवकांच्यात चर्चा सुरू होती. चर्चा सुरू असतानाच वाद वाढत जाऊन मारामारीस सुरुवात झाली. यावेळी एकाने तलवारीचा वापर करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने हल्ला करून कृष्णत जाधव यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, ज्याने तलवारीने वार केला त्यालाही इतर युवकांनी उसाने मारहाण केली. त्यामुळे तोही जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी संशयितांची धरपकड करतानाच जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. याबाबत शहर पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
कृष्णत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे अडीच वर्षांपूर्वी कृष्णत जाधव यांच्या कारची व रोहित वटकर याच्या दुचाकीची धडक झाली होती. या किरकोळ अपघातावरून वारंवार त्या दोघांत भांडणे होत होती. मंगळवारी रात्री कृष्णत जाधव हे जेवण करून बाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी होली फॅमिली स्कूलजवळ काही युवकांची भांडणे सुरू असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे युवकांची भांडणे सोडविण्यासाठी जाधव त्या ठिकाणी गेले. त्यावेळी एकाने त्यांच्यावर तलवारीने वार केले. या फिर्यादीवरून धनंजय वटकर, रोहित वटकर, अमित कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या उलट रोहित अशोक वटकर याने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री घरात असताना दीपक जाधव याने भांडणे मिटवण्याचे कारण सांगून बोलावून नेले. तेथे चर्चा सुरू असताना माझ्यासह धनंजय वटकर यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: War with sword by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.