प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करावीत : समशेरसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:27+5:302021-05-07T04:41:27+5:30
मलटण : फलटण शहरात प्रभागनिहाय कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करून मर्यादित असणाऱ्या लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव ...
मलटण : फलटण शहरात प्रभागनिहाय कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करून मर्यादित असणाऱ्या लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा, याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, नगर परिषद व जिल्हाधिकाऱ्यांना फलटण नगर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सध्या कोरोना रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. फलटण तालुक्यातदेखील अनेकांना कोरोना रोगाची लागण झाली आहे. तर तालुक्यात रोज २५० ते ३०० पेक्षा जास्त कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता राज्य व केंद्र शासनाने लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, फलटणमध्ये लसीकरण चालू आहे. परंतु लसीकरण केंद्रे मर्यादित असल्याने लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच अनेकांना लसीकरण केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. तसेच राज्यात कडक लाॅकडाऊन चालू आहे. लसीकरणाच्या नावाखाली अनेक नागरिक मोकाट फिरत आहेत. मर्यादित लसीकरण केंद्रे असल्याने आरोग्य कर्मचारी यांच्यावरदेखील ताण पडत आहे.
फलटण नगर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरात प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे सुरू केल्यास त्या प्रभागातील लोक तेथेच लस घेऊ शकतात. त्यामुळे एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा बसेल व गर्दीमुळे होणाऱ्या कोरोना प्रादुर्भावास आळा बसेल आणि फलटण कोरोनामुक्तीकडे वाटचाल करेल. या बाबीचा ताबडतोब सकारात्मक विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.