अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यासाठी शिंदी बुद्रुक ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:37 AM2021-04-15T04:37:39+5:302021-04-15T04:37:39+5:30
सातारा : माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि पोकळ महसुलीच्या नोंदी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला ...
सातारा : माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील अधिग्रहीत जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि पोकळ महसुलीच्या नोंदी विरोधात ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत माणच्या प्रांताधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदी बुद्रुक येथील गट नंबर ६०० (पूर्वीचा सर्व्हे नंबर १६९ व १७१) मधील १४ हेक्टरहून अधिक जमीन ही शिंदी येथील खातेदारांची आहे. यामधील सुमारे ९ एकर क्षेत्र तुपेवाडी लघुपाटबंधाऱ्यासाठी अधिग्रहण झाले आहे. मात्र, याचा मोबदला आतापर्यंत या सामायिक गटाची आणेवारी जुळत नसल्याने मिळला नाही. तसेच पूर्वीपासून २०१२ पर्यंत शिंदी बुद्रुक येथील गट नंबर ६०० मध्ये ज्यांच्या नावाची कोणतीही नोंद नव्हती. अशा खातेदारांची २०१२ला तत्कालीन गाव कामगार तलाठ्यांनी ९७ गुंठे क्षेत्राची वाढीव नोंद फेरफार अथवा कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजाशिवाय सातबारामध्ये कब्जेदार सदरी वाढीव क्षेत्राचा अंमल दिला आहे. यामुळे इतर अनेकांच्या हक्कावर गदा आली आहे. तत्कालीन तलाठ्याच्या काळात महसुली अधिनियमाचे उल्लंघन करून अनेक चुकीचे बदल केल्याचे उघड झाले आहे. यामुळे तहसीलदारांमार्फत चौकशीही सुरू झाली होती. या चौकशीमध्ये पोकळ नोंदी उघड झाल्या आहेत.
अशा गोष्टींबाबत ८ दिवसात संबंधित पोकळ नोंदी व अतिक्रमणधारकांचे अनुषंगाने कारवाई न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित खातेदारांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी भास्कर खरात, सूर्यकांत खरात, शंकर खरात, भीमराव खरात, छाया खरात आदी उपस्थित होते.
............................................................