उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:44+5:302021-02-11T04:41:44+5:30
सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड तालुक्यातील खोडशी व वहागाव या ठिकाणच्या सहापदरीकरणासाठी मोजणीप्रक्रिया बुधवारी सुरू करण्यात ...
सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड तालुक्यातील खोडशी व वहागाव या ठिकाणच्या सहापदरीकरणासाठी मोजणीप्रक्रिया बुधवारी सुरू करण्यात आली. ही मोजणीप्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कसल्याही अधिकृत नोटिसा न देता भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला. तसेच भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील वहागाव व खोडशी परिसरातील या वाढीव भूसंपादनामुळे परिसरातील अनेकजण भूमिहीन व बेघर होणार असल्याने परिसरातील शेतकरी, बाधितांचा या भूसंपादन प्रक्रियेला पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी बाधितांनी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी हरकती, आक्षेप घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे, मात्र भूसंपादन विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने शेतकरी व बाधितांना अंधारात ठेवून मनमानी पध्दतीने कारभार करीत असल्याने व संबंधिताकडून शेतकरीहिताची कसलीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने भूसंपादनाचा हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच परिसरातील वाढीव भूसंपादन रद्द करावे, या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी खोडशी व वहागाव परिसरातील सहापदरीकरणासाठी संपादित केल्या जाणाऱ्या मोजणी प्रक्रियेविरोधात परिसरातील बाधितांनी भूमिअभिलेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, तलाठी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आपली भूमिका मांडली. भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे उपस्थित शेतकरी व बाधितांनी सांगितले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे, अॅड. विक्रम कुलकर्णी, शंकर आतकरे यांच्यासह भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, कऱ्हाड शहर व तळबीड पोलीास ठाण्याचे कर्मचारी, तसेच परिसरातील शेतकरी, बाधित व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी : पुणे-बंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात सचिन नलवडे, शंकर आतकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी बुधवारी संबंधितांना निवेदन दिले.
फोटो नेम : 10वहागाव