कऱ्हाडच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:19+5:302021-03-13T05:10:19+5:30
निवेदनात म्हटले आहे की, जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी गत २८ वर्षे या केंद्रात विनाखंड सेवा केली आहे. पालिकेने तांत्रिक अडचणीमुळे ...
निवेदनात म्हटले आहे की, जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी गत २८ वर्षे या केंद्रात विनाखंड सेवा केली आहे. पालिकेने तांत्रिक अडचणीमुळे जलशुद्धीकरण केंद्र ठेका पद्धतीने चालवण्यास दिले आहे. वास्तविक पाहता न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कर्मचारी व पालिका यांचे मालक व कामगार हे नाते सिद्ध झाले आहे. मात्र १ मार्च २०१९ पासून पालिकेने दिलेल्या जुन्या ठेकेदाराची मुदत संपलेली आहे. तसेच पालिकेने ज्या नवीन ठेकेदाराला ठेका दिला आहे त्या ठेकेदाराला आर्थिकदृष्ट्या ते परवडत नसल्याने सदरचे जलशुद्धीकरण केंद्र चालविण्यात असमर्थता दर्शविली आहे.
याबाबत संबंधित ठेकेदाराने तसे कर्मचाऱ्यांना कळविले आहे. अशा परिस्थितीत सर्व कर्मचारी अक्षरश: उघड्यावर पडलेले आहेत. तरीही पाणीपुरवठ्याची अत्यावश्यक सेवा असल्यामुळे व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करत आहेत. १ मार्चपासून सर्व कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनावर राहील. तसेच कर्मचाऱ्यांच्या जीवित व वित्तहानीची जबाबदारी प्रशासनाची राहील. पालिकेने याबाबत त्वरित प्रशासकीय पातळीवर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे.