वारुंजीत सत्तांतर; यशवंत ग्रामविकासचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:30+5:302021-01-20T04:37:30+5:30
जिल्हा परिषद गटात महत्त्वाचे गाव म्हणून वारूंजी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व या गटात आहे. ...
जिल्हा परिषद गटात महत्त्वाचे गाव म्हणून वारूंजी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व या गटात आहे. वारूंजी ग्रामपंचायतीत १५ सदस्य संख्या आहे. त्यापैकी यशवंत ग्रामविकास पॅनेलचे ५ सदस्य बिनविरोध निवडून आले होते, तर दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मानणाऱ्या सर्वांना एकत्र करून मैदानात उतरवले होते. मतदान झालेल्या १० जागांपैकी नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखालील यशवंत ग्रामविकास पॅनेलने ७ जागांवर विजय मिळवला. मतदान प्रक्रियेतून निवडून आलेले सात व बिनविरोध निवड झालेले पाच अशी यशवंत ग्रामविकास पॅनेलची १२ सदस्यसंख्या झाली. एकूण पंधरापैकी बारा जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली; तर डॉ. अतुल भोसले यांना मानणाऱ्या विरोधी गटाला ३ जागांवरच समाधान मानावे लागले.
गत पंचवार्षिक निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडींमुळे गावात कधी यांची, तर कधी त्यांची सत्ता होती. राजकीय खेळी करत विरोधी गटाने सत्ता काबीज केली होती; मात्र या निवडणुकीत नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंधरापैकी बारा जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
फोटो : १९केआरडी०४
कॅप्शन : वारूंजी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.