वाईत होणार रस्ता रुंदीकरण
By admin | Published: December 23, 2014 09:36 PM2014-12-23T21:36:07+5:302014-12-23T23:50:09+5:30
वाहनचालकांना दिलासा : ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
वाई : नगरपालिकेने नेहमीची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यात्री निवासासमोरील वळणावरील वाडयाचा काही भाग संपादित करून तो हटविण्याचे कामकाज सुरू केल्याने नेहमी होणा-या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. वाईमध्ये वाहतुकीची कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे.
पाचगणी, महाबळेश्वर, मांढरदेव, धोम धरण अशा पर्यटन व धार्मिक स्थळे वाई शहरातून जोडली गेली असल्याने साहजिक मोठया प्रमाणावर रहदारी वाई शहरातून नेहमी होत असते. वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक, पर्यटक तसेच नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागे. त्यांच्या वेळेचा अपव्यय होत होता.
वाईमधील प्रसिध्द महागणपती मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर असल्याने अनेक पर्यटकांचा व भाविकांची वर्दळ या परिसरात असते. तसेच सकाळ-संध्याकाळ आॅफीस वेळेत मोठया प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे चित्रा टॉकीजच्या चौकापासून ते घोटवडेकर हॉस्पिटलपर्यंत नेहमी वाहतूक कोंडी होते. याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेने हालचाली केल्याने रस्ता सरळ होऊन नेहमीच्या होणा-या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.(प्रतिनिधी)
या परिसरात वाहतूकीची कोंडी नेहमी होत रस्ता रूंदिकरणासाठी
नागरिकांकडून अनेक दिवसांपासूनची मागणी होत होती. नगरपालिकेने यात्री निवासासमोरील व्यावसायिकांनी रस्त्यावर बांधलेले कट्टे काढले असून येथे पार्किंगसाठी पट्टे मारण्यात येणार असल्याने या परिसरातील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे.
- आशा राऊत --मुख्याधिकारी वाई नगरपालिका
===
वाईतील या वळणावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. नगरपालिकेने जागा संपादित करून रस्ता रूंद केल्याने महागणपतीला येणा-या भाविकांना तसेच नागरिकांना या परिसरात होणा-या वाहतुकीच्या कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
- अशोकराव पाटणे, व्यावसायिक