सातारा नगरपालिकेसमोर पाण्याचा धबधबा, यशवंत उद्यानातील व्हॉल्व्ह स्लीप झाल्याने लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 09:05 PM2018-03-23T21:05:15+5:302018-03-23T21:05:15+5:30
शुक्रवारी नवीन समस्या नगर पालिकेसमोर उभी ठाकली.
सातारा : शहरातील पाणी पुरवठा योजनेचे रोजच तीन-तेरा वाजत असून, शुक्रवारी नवीन समस्या नगर पालिकेसमोर उभी ठाकली. सातारा नगरपालिका कार्यालयासमोरील यशवंत उद्यान टाकीचा व्हॉल्व्ह अचानक स्लीप झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शनिवारही सातारकरांना कमी दाबानेच नळातून पाणी मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेमधील विविध दुरुस्त्यांची कामे केली जात असल्यामुळे शहरातील नागरिकांना कमी-जास्त प्रमाणात पाणी मिळत आहे. ‘काम सुरू आहे... पाणी जपून वापरावे’ असे आवाहन करणाऱ्या नगरपालिकेला साताराकरांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. गुरुवारी शहापूर योजनेतील दुरुस्त्या केल्या गेल्या. त्यानंतर बोगद्यापाठीमागील टाकीला जास्त प्रमाणात पाणी मिळाले. या टाकीतून शहरातील इतर टाक्यांनाही भरपूर पाणी मिळाल्याने पाण्याची पातळी वाढली. दरम्यान, खानीतील टाकीच्या पाण्याचा दाब अन् यशवंत टाकीमधील भरलेले पाणी यामुळे यशवंत उद्यानातील मुख्य व्हॉल्व्ह शुक्रवारी सायंकाळी अचानक स्लीप झाला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
याचाही फटका शनिवारी सातारकरांना बसणार असून कमी दाबानेच पाणी पुरवठा होणार आहे. तरी, सातारकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी केले आहे. म्हणजे ‘कामे होणार म्हणून पाणी कमी.. अन् टाकीला पाणी भरपूर आले म्हणून पुन्हा पाणी कमी!’ असा प्रकार सातारकरांच्या बाबतीत घडत आहे.