वाईतील सेवारस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:43 AM2021-09-23T04:43:51+5:302021-09-23T04:43:51+5:30
वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहते, तर शहराच्या दोन्ही बाजूंनी धोम धरणाचा डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी ...
वाई : वाई शहरामधून कृष्णामाई वाहते, तर शहराच्या दोन्ही बाजूंनी धोम धरणाचा डावा व उजवा कालवा वाहतो. नागरी वस्तीमधून जाणाऱ्या कालव्यामध्ये सुशिक्षित नागरिकही कालवा म्हणजे कचरा टाकण्याचे हक्काचे ठिकाण असल्याप्रमाणे कालव्यामध्ये कचरा टाकत असतात. ग्रामपंचायत यशवंतनगरची कचऱ्याची गाडी आठ-आठ दिवस येत नसल्याने नागरिकांना जागा दिसेल तेथे कचरा टाकावा लागत आहे.
वाई शहरातील सह्याद्रीनगर या भागात यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये, तसेच कालव्याच्या शेजारून जाणाऱ्या सेवारस्त्यावर परिसरातील नागरिक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कचरा, प्लास्टिक, घरात छोटे-कार्यक्रम झाल्यास पत्रावळ्या नियमित येणाऱ्या घंटागाडीत न टाकता कालवा परिसरात टाकतात. यामुळे परिसराला बकाल स्वरूप येऊन दुर्गंधी पसरते. प्लास्टिक खाल्ल्याने पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस मद्यपी बसत असल्यामुळे नागरिकांना त्रास होऊन परिसरात काचा व प्लास्टिकचे साम्राज्य होत असते. सकाळी- संध्यकाळी या परिसरात नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी ग्रामपंचायतीने कचरा उचलावा व अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. राज्यासह देशात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छताही महत्त्वाची आहे. त्यानुसार शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी आचारसंहिता आखून दिली आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात यावी, जेणेकरून कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण बंद होऊन आरोग्यास धोका पोहोचू नये. यासाठी रोज ग्रामपंचायतीकडून कचरा गाड्यांचे नियोजन केले पाहिजे. सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रशासनाबरोबर नागरिकांचेही कर्तव्य आहे. तरी अशा बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोट...
दत्तनगर ते सह्याद्रीनगर या परिसरातून जाणाऱ्या धोम उजव्या कालव्यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणणारे लोकही सर्रास कचरा टाकतात. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच मद्यपींचा उपद्रवही वाढला आहे. ग्रामपंचायतीने नियमित कचरा गाडी फिरवावी व यशवंतनगर ग्रामपंचायतीने डोळेझाक न करता संबंधित नागरिकांवर कडक कारवाई करावी.
-विकास सावंत, नागरिक, यशवंतनगर