उमेदवारांच्या प्रचार ‘उधळपट्टी’वर प्रशासनाचा ‘वॉच’

By admin | Published: November 17, 2016 10:59 PM2016-11-17T22:59:21+5:302016-11-17T22:59:21+5:30

कऱ्हाड पालिका निवडणूक : कारवाईसाठी भरारी पथकाची टीम; आता थेट कारवाई

'Watch' of administration on 'Udhalpatti' campaign | उमेदवारांच्या प्रचार ‘उधळपट्टी’वर प्रशासनाचा ‘वॉच’

उमेदवारांच्या प्रचार ‘उधळपट्टी’वर प्रशासनाचा ‘वॉच’

Next

कऱ्हाड : निवडणुकीत आपला जोरात प्रचार व्हावा म्हणून उमेदवारांकडून अनेक तऱ्हेचे प्रकार अवलंबिले जात आहेत. निवडणुकीसाठी करण्यात येणारा खर्च हा कागदोपत्री कमी दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. अशा छुपेगिरीने खर्च करणाऱ्या व निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या उमेदवारांवर पालिकेने वॉच ठेवत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांच्या उधळपट्टीवर निवडणूक व पालिका प्रशासनाने वॉच ठेवण्यासाठी चाळीस जणांच्या भरारी पथकाची टीम तयार केली आहे. त्यांच्याकडून दररोज कारवाई केली जात असल्याने उमेदवारांची अवस्था ‘सहनही होईना आणि सांगताही येईना,’ अशी झाली आहे.
कऱ्हाड पालिका निवडणुकीसाठी पक्ष तसेच आघाड्या व अपक्ष नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांकडून सध्या जोरात प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप व फ्लेक्स लावून तसेच संभाषण रेकॉर्डिंगच्या कॅसेट लावून वाहने शहरात फिरविली जात आहेत. तर दुसरीकडे रात्रीच्या वेळी प्रभागनिहाय मतदारांच्या घरी भेटी देत त्यांच्यासोबत चर्चा करीत त्यांना आश्वासने दिली जात आहेत. अशा दररोजच्या प्रचार पदयात्रा, गाड्यांच्याद्वारे शहरात केला जाणारा प्रचार तसेच प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या व्यक्तींचा चहा, नाष्टा व जेवणाचा दररोजचा खर्च यावर उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. त्यावर प्रशासनाकडून छुप्या पद्धतीने वॉच ठेवण्याचे काम केले जात आहे.
उमेदवाराच्या प्रचाराचे दररोजचे नियोजन निवडणूक विभागास सांगितल्याशिवाय न करणे बंधनकारक केल्यामुळे उमेदवारास अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे उमेदवाराच्या प्रचार रॅलीत पालिका प्रशासन व निवडणूक विभाग यांच्याद्वारे एकत्रित तयार करण्यात आलेल्या भरारी पथकातील कर्मचारीही सहभागी होत आहेत. त्यांच्याकडून ज्या ठिकाणी उमेदवार चुकीच्या पद्धतीने प्रचार करेल त्या ठिकाणी सूचना केल्या जात आहेत. सूचनांचे पालन न केल्यास तत्काळ कारवाईही देखील केली जात आहे.
पालिका प्रशासनाच्या या ‘वॉच’ टीममुळे उमेदवारांची प्रचारादरम्यान गोची होत आहे. नुसते हात जोडून आश्वासन देण्याशिवाय त्यांना काहीच करता येत नसल्याचे दिसून येत आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीममध्ये चाळीस जणांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये चार प्रमुख अधिकारी, पाच मुकादम तसेच तीन पोलिस अधिकारी तसेच बत्तीस कर्मचारी यांचा समावेश आहे. पालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एच. पाटील, रफीक भालदार, जगताप, ए. आर. पवार या चार अधिकाऱ्यांद्वारे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत अवास्तव खर्च करणाऱ्या उमेदवारांवर वॉच ठेवला जात आहे.
चाळीस कर्मचाऱ्यांच्या टीमने आत्तापर्यंत शहरात अनधिकृत सहा फ्लेक्स, कार्यकर्त्यांची गर्दी होणाऱ्या दोन ठिकाणची अतिक्रमणे, वीसहून अधिक ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या प्रचार वाहनांवर कारवाई केली असल्याची माहिती मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

ध्वनी तीव्रतेचीही सतत तपासणी
शहरात निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आपल्या प्रचारासाठी ध्वनीमुद्रित केलेल्या संदेश व घोषवाक्याची प्रचाराची वाहने शहरातून फिरविली जात आहेत. अशा वाहनांतून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केले जात असल्याने खुद्द नागरिकांतून पालिकेकडे तक्रारी गेल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीनुसार पालिकेच्या कारवाईच्या भरारी पथकातील कर्मचारी व पोलिस अधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या वाहनांमधील साऊंड सिस्टीमची ध्वनीची मर्यादा डेसिबल तपासली जात आहे. तसेच यावेळी चुकीचे आढळल्यास तत्काळ कारवाईही केली जात आहे.
पथक दिसल्यास
आवाज कमी !
निवडणूक प्रचारासाठी शहरातून प्रचाराच्या ध्वनीमुद्रित केलेल्या कॅसेट लावून फिरत असलेल्या वाहनांतील वाहनचालकांना त्या-त्या प्रचारचिन्हांच्या उमेदवारांकडून कारवाई पथकाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे वाहनचालक कारवाई पथक दिसल्यास तत्काळ आपल्या वाहनांतील घोषणांची आवाजाची मर्यादा कमी करीत आहे. तसेच आपण नियम पाळत असल्याचे दाखवून देत आहेत. पथक निघून गेल्यास आवाज वाढवित आहे.
प्रचारासाठी ‘सैराट’ अन् बॉलिवुड
गाण्यांचे डबिंग
‘सैराट’ मराठी चित्रपटातील ‘याड लागलं’ या गाण्याचे डबिंग करून तेच गाणे ‘याड लागलं रं याड लागलं, विकासकामे करण्याचे याड लागलं’ झोप येईना, निवडून येण्याचं राती सपान पडाय लागलं,’ अशी सैराट चित्रपटातील गाणी लावून मतदारांना आकर्षित केले जात आहे.
 

Web Title: 'Watch' of administration on 'Udhalpatti' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.