घड्याळ्याचे काटे मोहितेंच्या हाती !

By admin | Published: February 8, 2016 10:46 PM2016-02-08T22:46:20+5:302016-02-08T23:48:19+5:30

पवारांची ‘दक्षिण’मध्ये चाचपणी : राष्ट्रवादीच्या ताकदीसाठी प्रयत्न; वाठारला २० रोजी मेळावा

Watch the hand in the hand! | घड्याळ्याचे काटे मोहितेंच्या हाती !

घड्याळ्याचे काटे मोहितेंच्या हाती !

Next

प्र्रमोद सुकरे -- कऱ्हाड --एस. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन पक्षांची स्थापना करूनही थोरल्या पवारांना कऱ्हाड दक्षिणेत मात्र अद्याप यश काही हाती लागले नाही. त्यामुळे आजवर सहकारात रमलेले दक्षिणेतील युवा नेते अविनाश मोहिते यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन पवार हे पुन्हा एकदा राजकीय चाचपणी करणार आहेत. यावेळी तरी त्यांची दक्षिणेतल्या घड्याळाला चावी नीट बसणार का? याबाबत
साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यात कऱ्हाड दक्षिणचा क्रमांक वरचा लागतो. माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी याच मतदार संघातून आपली विजयाची सप्तपदी पूर्ण करत काँग्रेसचा हात येथे नेहमीच बळकट असल्याचे दाखवून दिले. अगदी एस. काँग्रेसपासून, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही पवारांनी दक्षिणेत दिवंगत विलासराव पाटील-वाठारकरांचा उमेदवारी देऊन विजयश्री मिळवण्याचा प्रयोग केला; पण त्याला यश आलेच नाही.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, कऱ्हाड दक्षिणेत विधानसभा निवडणुकीत त्यांना एकदाही यश मिळविता आले नाही. याचा सल पक्षातील अनेक नेत्यांच्या मनात कायम आहे. म्हणूनच कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांना २० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश देऊन थोरले पवार पुन्हा एकदा चाचपणी करीत असल्याची चर्चा सुरू झाली
आहे.
थोरल्या पवारांचे निष्ठावंत पाईक असणाऱ्या विलासराव पाटील-वाठारकर यांनी पवारांच्या सांगण्यावरून दक्षिणेतून एकदा एस. काँग्रेसचा चरखा फिरविला तर दोनदा घड्याळाला चावी देण्याचाही प्रयत्न केला; पण त्यांच्या त्या चावीने घड्याळाच्या यशाचा काटा काही पुढे सरकलाच नाही.
घड्याळाचा काटा फिरविण्यासाठी कृष्णाकाठचाच गडी हवा, हे पवारांनी हेरले होते. म्हणून तरी डॉ. अतुल भोसलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. त्यामुळे पक्षाला निश्चितच ‘बळ’ मिळाले. पण त्यांच्या उत्तरेवरील स्वारीमुळे ना त्यांना ना पक्षाला ‘फळ’ मिळाले. त्यानंतर पवारांनी अनेक मोहितेंना गळ टाकला होता. त्यातील हे मोहिते त्यांच्या गळाला लागले आहेत.
खरंतर गत विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड शहर दक्षिणेत समाविष्ठ झाल्याने आता दक्षिणेत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाने उंडाळकरांना पाठिंबा दिला असला तरी स्थानिक नेत्यांनी चव्हाणांचे हात बळकट करण्याचा निर्धार केल्याने उंडाळकरांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा फायदा झालाच नाही.
राज्यात अन् देशात कुठेच सत्तेत नसलेल्या पवारांनी सध्या पक्षबांधणीकडे चांगलेच लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच गत महिन्यांत पाटण तालुक्यातही थोरल्या पवारांचा पाटणमध्ये तर धाकट्या पवारांचा ढेबेवाडीत मोठा मेळावा झाला. आता लगेचच थोरल्या पवारांच्या उपस्थितीत कऱ्हाड दक्षिणेत वाठार येथे २० फेब्रुवारी रोजी भव्य मेळावा होतोय!
विलासराव पाटील-वाठारकारांच्या पश्चात दक्षिणेत राष्ट्रवादीचा वारसा त्यांचे पुत्र राजेश पाटील सांभाळत आहेतच. कऱ्हाड शहरातील उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची ताकद त्यात वाढलीच आहे. आता अविनाश मोहितेंच्या प्रवेशाने त्यात आणखी भर पडणार आहे. अन् त्याची पहिली
चाचणी परीक्षा येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेत होईल, यात शंका नाही. तोवर या पक्ष प्रवेशास
शुभेच्छा द्यायला हरकत
नाही!


‘कृष्णा’च्या राजकारणात निश्चित फायदा!
अविनाश मोहितेंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीचा फायदा होणार, हे निश्चित ! पण त्याचा तोटा कोणाकोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. साहजिकच विद्यमान काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना याचा तोटा सहन करावा लागणार आहे. पण याचा फटका मात्र माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनाही बसणार असल्याची चर्चा आहे. दस्तुरखुद्द या पक्ष प्रवेशाचा अविनाश मोहितेंना दक्षिणच्या राजकारणात कितपत फायदा होईल, हे माहीत नाही; पण त्यांना कृष्णा कारखान्याच्या राजकारणात फायदा निश्चित मानला जातो.

राष्ट्रवादीलाही पर्याय हवा होताच..
गत विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिणेतून खासदार उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक राजेंद्र यादव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यानंतर पक्षाने ती उमेदवारी मागे घेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासराव पाटील- उंडाळकर यांना पाठिंबा देऊन एक चाल खेळली; मात्र उंडाळकर हाताला लागत नाहीत म्हटल्यावर राष्ट्रवादी आता अविनाश मोहितेंना जवळ करीत आहे.

Web Title: Watch the hand in the hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.