परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 02:33 PM2021-12-24T14:33:13+5:302021-12-24T14:33:51+5:30
परदेश दौऱ्यावरून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
सातारा : फलटण तालुक्यात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर परदेश दौऱ्यावरून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
खंडाळा तालुक्यात गुरुवारी टांझानियातून आलेल्या एका नागरिकाच्या तपासणीत त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यानंतर आरोग्य विभागाने या व्यक्तीचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
ओमायक्रॉनचे संकट घोंगावू लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये तीन आठवड्यांत ५५४ लोक परदेशातून आले आहेत. यापैकी ३३२ लोकांची आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. यातून फलटण तालुक्यातील ४ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोना झालेल्या यापैकी तिघांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, खंडाळा तालुक्यातील एक व्यक्ती गुरुवारी परदेश दौऱ्यावरून जिल्ह्यात आली. आरोग्य विभागाने त्याची कोरोना चाचणी केली. या चाचणीत बाधित आढळल्यानंतर या व्यक्तीला क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षात ठेवले, तसेच या व्यक्तीचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले असून, तपासणी अहवाल आठ दिवसांनंतर प्राप्त होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यामध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. त्यात बाधित आढळलेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. परदेशातून खंडाळा तालुक्यात आलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाला गुरुवारी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. संबंधिताचे नमुने अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. -डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी.