औंधच्या बंधाऱ्यातील पाणी लागले तापायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:03+5:302021-03-05T04:39:03+5:30
औंध : औंध येथील केदारेश्वर येथील बंधारा पाडण्यात यावा यासाठी १ मार्चपासून हनुमान मंदिरात उपोषण सुरू आहे़, तर दुसऱ्या ...
औंध : औंध येथील केदारेश्वर येथील बंधारा पाडण्यात यावा यासाठी १ मार्चपासून हनुमान मंदिरात उपोषण सुरू आहे़, तर दुसऱ्या बाजूने ३५ शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन, बंधारा पाडू नका, आहे तसाच ठेवा यासाठी कृषी विभागाला देण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर औंध येथील बंधाऱ्याचे पाणी तापले आहे त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
केदार चौकलगतच्या ओढ्यात २०१४ मध्ये बंधारा बांधलेला आहे. त्यानंतर पाणी साठण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. या ठिकाणी येणारे परिसरातील पाणी, गटाराचे पाणी, शौचालयाचे पाणी यामुळे पाणी दूषित होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला, अशा तक्रारी ग्रामस्थांनी अनेक वेळा केल्या. ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी, कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन, बंधाऱ्याची भिंत पाडण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यासाठी आसपासच्या महिलांनी लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दिला आहे.
उपोषणाचा दुसरा दिवस उजाडतोय तोच, बंधारा पाडू नका यासाठी ३५ शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. बंधाऱ्यामुळे सहा विहिरी आणि १३ बोअरवेलना फायदा झालेला आहे. त्यामुळे राजकीय द्वेषापोटी हा बंधारा पाडण्याची मागणी असल्याचा आरोप जगन्नाथ गायकवाड यांनी निवेदनात केला आहे.