कालव्यात पाणी; शेतकरी समाधानी..!
By admin | Published: April 26, 2017 01:26 PM2017-04-26T13:26:29+5:302017-04-26T13:26:29+5:30
खंडाळा तालुका ; धोम बलकवडीचे पाणी खळाळू लागले; प्रशासनावरील ताण कमी
आॅनलाईन लोकमत
खंडाळा (जि. सातारा), दि. २६ : खंडाळा तालुक्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर धोम-बलकवडी कालव्याचे पाणी भरभरून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर धोम बलकवडीच्या पाण्याने तालुका टँकरमुक्त झाला आहे. त्यामुळे प्रशासनावरील ताण सुध्दा कमी झाला आहे.
खंडाळा तालुक्याच्या माथ्यावरील दुष्काळी टिळा कायमस्वरुपी पुसून धोम बलकवडी प्रकल्प तालुक्यासाठी वरदान ठरलेला आहे. या कालव्यामुळे जवळपास अर्ध्या तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेती पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यात किमान दोन आवर्तने सोडण्यात यावीत अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांची होती. खंडाळा तालुक्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी धोम बालकवडी प्रकल्पाच्या प्रशासनाला सूचना करून पाणी सोडण्यास सांगितले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही माळरानातून पाणी खळाळताना दिसत आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटी पाणी सुटल्याने या कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील असवली पासून ते कोपर्डेपर्यंतच्या अठरा गावात शेती सिंचनाची समस्या मिटली आहे. या भागातील सर्व बंधारे, विहिरी, पाझर तलाव तुडूंब भरले जात असल्याने ह्यपाणीच पाणी चहुकडेह्ण अशी स्थिती पहायला मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांसाठी होणार आहे.
सध्या तालुक्यात यात्रांचा हंगाम चालू आहे. या काळात लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याची निकडही भागणार आहे. तसेच या भागातील सर्व पाण्याचे साठे भरल्यास पुढील दोन महिने पाण्याची कोणतीच समस्या उरणार नाही.
टँकरमुक्तीला चालना...
दरवर्षी उन्हाळ्यात दोन महिने तालुक्यात काही गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करावा लागत होता. पण धोम बलकवडीचे पाणी आल्याने तालुक्यात टँकरमुक्ती करणे शक्य झाले आहे. तसेच लाभक्षेत्राबाहेरील गावांनाही ओढ्यातून पाणी जात असल्याने त्यांचाही प्रश्न मार्गी लागला आहे.
फळबागांना जीवदान
खंडाळा तालुक्यात कांदा, ऊस यांसारख्या नगदी पिकांसोबत फळबागांची लागवड अनेक ठिकाणी केली आहे. या पाण्यामुळे सिंचनासाठी तयार केलेले शेततळे भरून घेता येणार आहे. त्याच पाण्याचा वापर करून उन्हाळ्यात फळबागांना जीवदान देणे शक्य होणार आहे.
खंडाळा तालुक्यातील जनतेची धोम बलकवडीचे पाणी सोडण्याबाबत सातत्याने मागणी होती. उन्हाळ्यात पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांचा अधिकचा फायदा होणार आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मोर्वे गावापर्यंत पोहचू शकले आहे. यापुढचे कामही जलद गतीने पूर्ण करून आठवड्यात पाणी वाघोशीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न राहणार आहे .
- मकरंद पाटील, आमदार