पाणीटंचाईच्या गावात अखेर ‘जलक्रांती’
By Admin | Published: June 29, 2015 10:36 PM2015-06-29T22:36:16+5:302015-06-30T00:20:12+5:30
काळगाव पाणलोट प्रकल्प : पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृद संधारणाची कामे
सणबूर : पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवून त्याद्वारे जलक्रांती आणण्याचे काम पाणलोट विकासाच्या कार्यक्रमातून होत असते. काळगाव, ता. पाटण भागात या कार्यक्रमांतर्गत भरीव काम दृष्टीस पडत आहे. त्यामुळे या भागात जलक्रांती झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम घाट विकास योजनेअंतर्गत १९९९ ते २००६ या कालावधीत या भागात पाणी आडवून जिरविण्याचे मोठे काम झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काळगाव के. आर. ३०/९ या पाणलोटचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५ हजार ७१८ हेक्टर असून, त्यापैकी ३ हजार ८११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तर उर्वरित १८०९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलिताखाली आहे. त्यापैकी १०६० हेक्टर वनक्षेत्र आहे. या पाणलोटात काळगाव, आचरेवाडी, रामिष्टेवाडी, भरेवाडी, सावंतवाडी, कोळगेवाडी, मुट्टलवाडी, टिटमेवाडी, करपेवाडी, बोरगेवाडी, डाकेवाडी, मस्करवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, धामणी, चव्हाणवाडी, पाटीलवाडी, शेडगेवाडी, मस्करवाडी १ व २, बादेवाडी, जाधववाडी, कुटरे, सुपुगडेवाडी, पवारवाडी, वाजोली आदी गावांचा व वाड्यांचा समावेश आहे.
यापैकी काही गावांना पूर्वी मोठी पाणीटंचाई जाणवत होती. जानेवारी महिन्यापासून पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसावर प्रामुख्याने भात पीक घेतले जायचे. उत्पादन अगदीच मर्यादित होते. उर्वरित ओलीवर ज्वारीचे पीक घेतले जात होते. जनावरांच्या पाण्याची मोठी गैरसोय होती.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाच्या पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृदा संधारणाची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आराखडाही तयार झाला. त्यानंतर दि. ७ डिसेंबर १९९९ रोजी भुरेवाडी येथील मातीनाला बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या पाणलोटात आजअखेर मातीनाला बांध, वळण बंधारे, शेततळी, प्लॅनिंग सीसीटी आदी कामे झाली आहेत. पाणीस्त्रोताचे बळकटीकरण झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मदत झाली. नालाबांध व बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे.
याशिवाय शेतकरी झेंडू, केळी व पालेभाज्यांची पिकेही घेऊ लागली आहेत. विविध प्रकारची बियाणे आणून शेतीतील नवनवीन प्रयोग ते करीत आहेत. (वार्ताहर)
विजेशिवाय शेतीला पाणी...
कोळगेवाडीने तर जलसंधारणाच्या माध्यमातून ‘विजेशिवाय शेतीला पाणी’ हा प्रयोग साकारून जलसंधारणाचा ‘कोळगेवाडी पॅटर्न’ महाराष्ट्रापुढे ठेवला आहे. या भागातील अनेक विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. पूर्वीच्या कोरडवाहू क्षेत्रात चाचपडणारा शेतकरी नव्या प्रवाहात येऊ पाहत आहे. ‘कोळगेवाडी पॅटर्न’ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
प्रकल्पासाठी चार कोटी खर्च
लोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांचे या पाणलोटासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. कृषी विभागाने काढलेल्या या अर्थशास्त्रानुसार एकूण पाणीसाठा ९०४ टीसीएम असून, सुमारे ४ कोटी १ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पापूर्वीचे बागायती क्षेत्र २६ हेक्टर होते. मात्र प्रकल्पानंतर ते ११७ हेक्टरवर गेले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळगाव भागातील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत.