सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:56 PM2019-05-06T14:56:55+5:302019-05-06T14:58:36+5:30

सातारा शहरालाही आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सातारा पालिकेने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Water cut in Satara city one day a week | सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

सातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात

Next
ठळक मुद्देसातारा शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपाततीव्र टंचाई, कास तलावात अत्यल्प पाणीसाठा

सातारा : सातारा शहरालाही आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सातारा पालिकेने संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा शहरात शहापूर योजना व कास तलावाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मध्य व पश्चिम भागात सातारा पालिकेच्यावतीने तर पूर्व भागाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. संपूर्ण मे महिना आणि पाऊस सुरु होण्याचा ठरलेला दिवस ७ जून गृहित धरुन ३२ दिवस शहापूर आणि कास तलावातून पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

कास धरणात आत्ता वापरण्यायोग्य तीन फूट पाणी शिल्लक आहे तर उर्वरित पाच फूट पाणी हे डेडस्टॉक म्हणून मोजण्यात येते. सातारा शहराला रोज एक इंच पाणी कास धरणात सोडण्यात येते, त्यामुळे ३१ मे पर्यंत कास धरणातील पाणी उपयोगात आणले जावू शकते, तथापि यंदा १0 मे पासून दर सोमवारी भैरोबा टाकीमधून आणि शहापूर पंपिंग लाईनवरुन वितरित करण्यात येणार पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.

आठवड्यातून एक दिवस पाणी बंदच्या निर्णयामुळे रोज सुमारे १५ लाख लिटर पाणी वाचविले जाणार आहे. पावसाळा लांबला तर बचत केलेल्या पाण्याचा आणि डेडस्टॉकमधून अहोरात्र पंपिंग करुन पाणी उचलून ते सातारकरांना पुरविले जाणार आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करावी. पाण्याचा दुरुपयोग करु नये. रस्त्यावर पाणी शिंपडू नये, गाड्या धुवू नयेत, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सातारा पालिकेत तातडीची बैठक घेण्यात आली होती. संभाव्य पाणी टंचाई भासू नये म्हणून एकत्रित बैठक घेण्यात आली.
 

यंदा पावसाळा उशीरा सुरु होण्याचे अनुमान वर्तविण्यात येत आहेत. पाऊस जर लांबला तर सातारकरांवर पाण्याचे अरिष्ट कोसळू नये म्हणून आवठड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रोज पंधरा लाख लिटर पाणी वाचेल हेच पाणी मे मधील टंचाईच्या काळात वापरता येणार आहे.
- माधवी कदम, नगराध्यक्षा


असे आहे पाणी बंदचे वेळापत्रक

दर मंगळवारी व्यंकटपुरा टाकी आणि घोरपडे टाकीमधून दुपारच्या सत्रात सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात येईल. बुधवारी कोटेश्वर टाकीमधून आणि घोरपडे टाकीमधून सकाळच्या सत्रात सोडण्यात येणारे, दर गुरुवारी कात्रेवाडा टाकी आणि गुरुवार टाकीमधून पहिल्या झोनमध्ये सोडण्याचे पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.

शुक्रवारी समर्थ मंदिर व पूर्वेकडील भाग, मंगळवार पेठ, मनामती चौक, नागाचा पार, गारेचा गणपती, बोगदा परिसर, शनिवारी गोलटाकी लाईनवरुन संत कबीर सोसायटी, पोळवस्ती तसेच यशवंत गार्डन टाकीमधून सोडण्यात येणारे पाणी, रविवारी बोगदा परिसर खापरी लाईनमधून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Water cut in Satara city one day a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.