कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: October 27, 2023 02:04 PM2023-10-27T14:04:49+5:302023-10-27T14:20:14+5:30

धरणातील पाण्यावर तीन सिंचन योजना..

Water demand from Sangli for irrigation, discharge from koyna dam started | कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या

कोयना धरणातून विसर्ग सुरू, सांगलीकडून सिंचनासाठी पाणी मागणी; पाणीसाठा किती..जाणून घ्या

सातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे यंदा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण भरले नाही. त्यातच पावसाअभावी सिंचनासाठी मागणी वाढत आहे. त्यानुसर आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही मागणी झाल्याने धरणातून १०५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरणात सध्या ८९ टीएमसीवरच साठा शिल्लक आहे.

महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीमएसी इतकी आहे. धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच पिण्यासाठीही पाण्याची तरतूद आहे. तर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठीही पाणी विसर्ग करण्यात येतो. धरणाच्या आतापर्यंतच्या सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात कोयना धरण नऊ वेळा भरलेले नाही. यावर्षी तर पाऊस कमी असल्याने धरणातील पाणीसाठा ९३ टीएमसीपर्यंतच पोहोचला. 

सध्या धरणातून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत चालली आहे. साताऱ्यासह इतर जिल्ह्यातही कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याचे तसेच योग्य वापराच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तरीही दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी एकपासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन त्यातून १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होणार आहे. तर एक महिन्यापूर्वीही सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी झाल्याने धरणातून पाणी विसर्ग करण्यात आलेला. गेल्या दोन महिन्यात तीनवेळा सांगलीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे.

धरणातील पाण्यावर तीन सिंचन योजना...

कोयना धरणातून सिंचनासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये टेंभू योजना, ताकारी आणि म्हैसाळ या तीन मोठ्या पाणी योजनांचा समावेश आहे. या तिन्ही योजनांचे पाणी सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच टेंभू योजनेचे पाणी सातारा जिल्ह्यातील सिंचनासाठीही दिले जात आहे.

कोयना परिसरात पाऊस कमी...

जिल्ह्याचा पश्चिम भाग पावसाचा समजला जातो. पण, यंदा पर्जन्यमान कमी राहिले आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा आतापर्यंत ४०६० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर नवजाला ५६४२ आणि महाबळेश्वरला ५४५१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे अनेक धरणे यंदा भरलेली नाहीत. परिणामी यंदा पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढतच जाणार असल्याने धरणसाठा वेगाने कमी होणार आहे.

Web Title: Water demand from Sangli for irrigation, discharge from koyna dam started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.