कर न भरणाऱ्या थकबाकीदारांचे पाणी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:39+5:302021-02-20T05:49:39+5:30
पाचगणी : भोगवली (ता. जावळी) ग्रामपंचायतीने वर्षभर ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकबाकी न भरणाऱ्या आठ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित ...
पाचगणी : भोगवली (ता. जावळी) ग्रामपंचायतीने वर्षभर ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकबाकी न भरणाऱ्या आठ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित केले, तर ११ थकबाकीदारांनी भीतीपोटी थकबाकी भरल्याने दोन तासांत २६ हजारांचा कर वसूल गोळा झाला आहे.
भोगवली (ता. जावळी) ग्रामपंचायतीची कर वसुली नेहमीच थकत असल्याने गावचा विकास त्यामुळे अडखळत होता. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनीच असहकार्याच्या भावनेतून थकबाकी थकवली होती. त्याबरोबर काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी भरली नाही, हे वर्षानुवर्षे असेच चालत असल्याने थकबाकी वसूल होत नव्हती. हा प्रकार जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्या निदर्शनास आल्याने जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती जावळी यांच्या आदेशाने ग्रामपंचायत वसूल गोळा करण्याकरिता ग्रामपंचायत भोगवली तर्फ कुडाळ येथील कर वसुलीकामी तसेच थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याकरिता त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. यामध्ये ग्रामसेवक रजनीकांत गायकवाड, युवराज पवार, सुशील नाळे या पथकातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी ग्रामपंचायत थकबाकीदारांची पाणी जोडणी खंडित करण्यात आली. यावेळी सरपंच अश्विन गोळे, वंदना गोळे, सुप्रिया गोळे, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश पवार, संजय गोळे, अनिल गोळे उपस्थित होते.
गुरुवारी सकाळीच कर वसुलीची ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये थकबाकीदार असणाऱ्या थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले, तसेच त्याबाबतची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. लवकर थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नळकनेक्शन खंडित केलेल्या थकबाकीदारांनी पाणीपट्टी न भरता कनेक्शन जोडणी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
सोबत फोटो आहे:
१९पाचगणी
भोगवली (ता. जावळी) येथे पाणीपट्टी न भरणाऱ्या थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करताना पथकातील अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. (छाया : दिलीप पाडळे)