शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी
By admin | Published: October 1, 2014 10:07 PM2014-10-01T22:07:34+5:302014-10-02T00:17:16+5:30
परतीच्या पावसाने हानी : कांदा, बटाटा, सोयाबीन भिजले, घरांवरील पत्रे उडाले, दुकानांमध्ये पाणी शिरले
कऱ्हाड/मलकापूर : कऱ्हाड शहरासह तालुक्याला मंगळवारी परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला़ वादळी वारे, विजांचा कडकडाट व जोरदार कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले़ मलकापूरमध्ये काही दुकानगाळ्यात पाणी शिरल्याने विक्रेते व व्यावसायिकांचे साहित्य भिजले तर जोराच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील छत उडून गेले़
कऱ्हाडला मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला़ काही ठिकाणी गारपीटही झाली़ यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले़ मलकापूर येथील अशोक पाचुंदकर यांच्या मालकीच्या रेवणसिद्ध रोप वाटिकेतील दोन एकराचा झेंडू फुलांचा प्लॉट भुईसपाट झाला़ या प्लॉटमधून पाचुंदकर यांना किमान दहा टन फुलांचे उत्पादन अपेक्षित होते़ मात्र, फुलझाडे मोडून पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले़ याशिवाय रोपवाटीकेतील रोपांचे वाफेही जमीनदोस्त झाले़ रोपवाटीकेचे छत मोडून पडले़ जखिणवाडी, कापिल, गोळेश्वर, चचेगाव परिसरात भाजीपाल्याचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते़ मात्र, मंगळवारी झालेल्या पावसाने दोडका, कारली यासारख्या वेलवर्गीय पिकांची हानी झाली़
मलकापूर येथील मधुकर महादेव शेलार यांच्या दोन एकर शेतजमिनीतील ऊस पीक भुईसपाट झाले आहे़ सध्या शिवारात सोयाबीन काढणीस वेग आला असून मंगळवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला आहे़ तसेच सोयाबीन भिजल्याने त्यांचे लाखो रूपयांचे नुकसानही झाले आहे़
दरम्यान, बुधवारी दुसऱ्या दिवशीही दुपारपासून तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली़ शहर परिसरात दुपारपासून संततधार पाऊस पडत होता़ त्यामुळे सखल भागात पाणी साचले़ मंगळवारच्या तुलनेत बुधवारी वाऱ्याचा जोर व विजांचा कडकडाट कमी असल्याने नुकसानीची घटना घडली नाही़
बुधवारी सायंकाळी खटाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. औंधसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामध्ये बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. (प्रतिनिधी)
औंध परिसराला पावसाने झोडपले
औंधसह परिसराला बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले. तर या पावसामुळे कांदा, बटाटा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. परिसरात शेतमशागतीची तसेच पेरणीची कामे सुरू झाली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. गेल्या चार दिवसांपासून उष्मा वाढला होता. मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी सायंकाळी औंधसह जायगाव, भोसरे, वरुड, गोसाव्याची वाडी, पळशी, गोपूज, नांदोशी, खबालवाडी, वडी, कळंबी आदी भागाला पावसाने झोडपून काढले.
जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी गटार तुंबून पाणी रस्त्यावर पसरले़ पावसामुळे महामार्गाच्या पश्चिमेकडील गटार तुंबले़ परिणामी, शिवछावा चौकापासून जवळच असलेल्या हिंदुस्थान मार्बल हाऊस दुकानासमोर तळे साचले़ गटारचे पाणी रस्त्यावर पसरल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती़
नवरात्र मंडळाच्या मंडपाचे नुकसान
मलकापूरसह आगाशिवनगर परिसरातील नवरात्र उत्सव मंडळांच्या मंडपाचे मंगळवारच्या पावसाने नुकसान झाले़ अनेक मंडळांच्या मंडपाचे छत फाटले़ तर काही मंडपांचे खांब मोडून पडले़ आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीतील मंडळाचा मंडप अक्षरश: भुईसपाट झाला़ स्वागतकमानीही मोडून पडल्या़