राजकीय ‘ठिणग्यां’वर फिरतंय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 11:39 PM2019-02-05T23:39:52+5:302019-02-05T23:40:07+5:30
कलेढोण परिसरात पाणलोट व पाणी फाउंडेशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जलसंधारण कामाच्या निमित्ताने राजकीय गटबाजीचे दर्शन होत आहे. गटातटाचे राजकारण, अस्तित्व व श्रेयवादापोटी अधूनमधून राजकीय ठिणग्या पडत आहेत.
संजय जगताप ।
कलेढोण : कलेढोण परिसरात पाणलोट व पाणी फाउंडेशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जलसंधारण कामाच्या निमित्ताने राजकीय गटबाजीचे दर्शन होत आहे. गटातटाचे राजकारण, अस्तित्व व श्रेयवादापोटी अधूनमधून राजकीय ठिणग्या पडत आहेत. मात्र, महिलांच्या एकजुटीमुळे त्यावर चाप बसत आहे. चांगल्या कार्यात कोणीही राजकारण आणू नये, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
कलेढोणला पाणलोट विकास व पाणी फाउंडेशनअंतर्गत जलंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्यासाठी सारा गाव एकवटला आहे. अधिकाधिक कामे पूर्ण करून गावाच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा टिळा कायमचा पुसण्यासाठी सर्वांनी वज्रमूठ आवळली आहे. मात्र, ती कामे करत असताना आघाडीवरील स्थानिक नेते, कार्यकर्ते कळीचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. कुरघोड्यांचे राजकारण सुरू होत आहे. राजकीय अस्तित्व व श्रेयवाद उफाळून येत आहे, त्यामुळे शह-काटशहांचे राजकारण सुरू होत आहे. त्याचा एकंदरीत दुष्परिणाम गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर होत आहे.
मनमानी, हटवादीपणा, इतरांना विश्वासात न घेण्याची मनोवृत्ती यामुळे एकमेकांची मने दुखावली जात आहेत. माझ्यामुळेच सर्वकाही सुरू आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करीत स्थानिक नेते व कार्यकर्ते इतरांना कमी लेखत आहेत. परिणामी नाराजी व्यक्त करीत काहीजण विकासकामाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे कामांवर विपरित परिणाम होत आहे. मात्र, नेते आणि कार्यकर्त्यांच्या त्या स्वार्थी, श्रेयवादी वागण्याला महिलांकडून चाप बसत आहे. महिलांनी गटतट, राजकीय स्वार्थ, श्रेयवाद यासह सर्व प्रकारच्या भेदांच्या भिंती पार करीत पाणी फाउंडेशनच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.
वाड्यावस्त्यांवर महिलांच्या बैठका
गावासह वाड्या-वस्त्यांवर गाठीभेटी होत आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत बैठका घेत आहेत. महिला भगिनींचे समुपदेशन करीत आहेत. पाणी फाउंडेशनच्या लोक चळवळीत उडी मारण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाणी फाउंडेशनच्या कामांत श्रमदान, अन्नदान करण्यासाठी त्या पुढे येत आहेत.
राजकीय नेते, कार्यकर्ते निष्प्रभ
यांत्रिक कामांसाठी लागणाऱ्या इंधनासाठी खारीचा वाटा म्हणून आर्थिक बोजा उचलत आहेत. महिलांची एकी झाल्यामुळे पाणी फाउंडेशनच्या कामाला वेग आला आहे. पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढे टाकत महिला कामाला लागल्या आहेत. महिलांच्या एकजुटीपुढे राजकीय नेते व कार्यकर्ते निष्प्रभ ठरत आहेत. तरीही, गटातटाचे राजकारण न करता सर्वांनी एकीची वज्रमूठ आवळून गावाच्या विकासकार्यात हातभार लावावा. चांगल्या कामात अकारण राजकारण आणू नये, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
कलेढोण येथे पाणी फाउंडेशनअंतर्गत जलंसधारणाच्या कामाबाबत परिसरातील स्थानिक महिला एकवटल्या.