मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे कारंजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:30+5:302021-07-01T04:26:30+5:30
महाबळेश्वर : वेण्णालेकनजीक प्रतापसिंह उद्यानाजवळ मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने साधारण तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे ...
महाबळेश्वर : वेण्णालेकनजीक प्रतापसिंह उद्यानाजवळ मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्याने साधारण तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. दरम्यान या गळतीमुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही.
महाबळेश्वर-वेण्णालेक या मुख्य रस्त्यावर प्रतापसिंह उद्यानानजीक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा वेण्णालेक पंपिंग स्टेशनपासून विल्सन पॉईंटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेली लोखंडी जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी फुटल्याने सुमारे तीस ते चाळीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे कारंजे इतक्या उंचीवर गेले होते की हे पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या वीजवाहक तारांना स्पर्श करत होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
गेल्या तीन वर्षांमधील पाणी वाया जाण्याची ही सहावी घटना आहे. दरम्यान, शहरातील कोळीअळी, मरीपेठ, रामगड शिक्षक सोसायटी तसेच माउंट माल्कम हायलेवल येथून पाणीपुरवठा होणाऱ्या सोसायटी रांजणवाडी, गादळवाडी, सातारा रोड व तापोळा रोड या सर्व भागात पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीनंतर सुरळीत होईल, असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितले.
फोटो ३०महाबळेश्वर वॉटर
महाबळेश्वर येथील मुख्य जलवाहिनी फुटल्याने उंचच उंच कारंजे उडाले होते. (छाया : अजित जाधव)