विसर्जनासाठी हौद; सोबत निर्माल्य कलशही !

By admin | Published: September 20, 2015 08:55 PM2015-09-20T20:55:57+5:302015-09-20T23:45:14+5:30

कऱ्हाडात पूर्वतयारी : पोलिसांचा खडा पहारा; प्रीतिसंगमावर बॅरिकेटस्

Water for immersion; Along with Nirmalya Kalashhi! | विसर्जनासाठी हौद; सोबत निर्माल्य कलशही !

विसर्जनासाठी हौद; सोबत निर्माल्य कलशही !

Next

कऱ्हाड : शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशाचे थाटात आगमन झाल्यानंतर हा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच पालिका व पोलिसांनी गणेश विसर्जनाची पूर्वतयारी करण्यासही सुरूवात केली आहे. मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यासह प्रीतिसंगमावर आवश्यक त्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत. पालिकेने मूर्ती विसर्जनासाठी हौद बांधले आहेत, तर पोलीस मिरवणूक बंदोबस्ताच्या तयारीला लागले आहेत.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास कऱ्हाडला अनेक धार्मिक, ऐतिहासिक अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे दररोज हजारोच्या संख्येने नागरिक, पर्यटक भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी कृष्णा - कोयना नदीच्या काठी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी तालुक्यातून गणेश मंडळे येणार आहेत. या ठिकाणी दरवर्षी होणारी तारांबळ लक्षात घेऊन प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत रोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या ठिकाणी नुकतीच भेट दिली. येथील परिसराची पाहणी करून यंदाच्या वर्षी गणेशभक्तांना मूर्ती विसर्जनादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी उपाययोजनाही आखल्या आहेत.येथील कृष्णा नदीपात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर नदीचे प्रदूषण होते. विसर्जनादरम्यान नागरिकांकडून घरातून आणलेले निर्माल्य हे निर्माल्य कुंडात न टाकता ते नदीमध्येच टाकले जाते. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात भर पडते. हा प्रकार थांबविण्यासाठी पालिका व एन्व्हायरो नेचर क्लब यांच्या वतीने शहरात यंदाच्या वर्षी तीन ठिकाणी जलकुंड व पाच ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून नदीचे प्रदुषण न होता मुर्तींचेही एकत्रित कुंडात विसर्जन केले जाऊ शकेल.यंदाच्या वर्षी प्रशासनाबरोबर सामाजिक संघटना, सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील प्रदुषणाबाबत खबरदारी घेत अभिनव उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये येथील नगरसेवक विक्रम पावसकर मित्र मंडळ व सोमवार पेठेतील श्रीकृष्ण गजानन मंडळ ट्रस्टतर्फे निर्माल्य संकलन कलश संकल्पना राबवली आहे. त्यातून निर्माल्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावता येणार आहे. दरवर्षी विसर्जनावेळी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गणेशमुर्तीच्या विसर्जनाची अडचण लक्षात घेता टेंभू धरणातील पाणी अडविण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी टेंभू धरण पाणी उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. नदीपात्रात पाणी साचू लागले आहे. विसर्जनादरम्यान अनुचित घटना घडून नये यासाठी मुख्य चौकामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


दिवसेंदिवस कृष्णानदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. सण, उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नदीप्रदूषण नागरिकांकडून केले जाते. यंदाच्यावर्षी गणेश विसर्जनवेळी नदीचे प्रदूषण होवू नये म्हणून पालिका व एन्व्हायरो नेचर क्लबतर्फे विसर्जन ठिकाणाबरोबर विविध ठिकाणी जलकुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्यामध्येचे गणेशमूर्ती व निर्माल्य टाकावे, अस आवाहन नागरिकांना आम्ही करत आहोत.
- जालिंदर काशीद, अध्यक्ष, एन्व्हायरो नेचर क्लब, कऱ्हाड


गेल्यावर्षी ७६७ मूर्ती, यंदा किती ?
गेल्यावर्षी गणेश विसर्जनावेळी पालिका व एन्व्हायरो नेचर क्लब यांच्यावतीने विसर्जन ठिकाणी जलकुंड ठेवण्यात आले होते. त्यावेळी ७६७ गणेशमूर्तीचे विसर्जन जलकुंडात झाले होते. यंदाच्यावर्षी ते प्रमाण किती असणार हे विसर्जनावेळीच स्पष्ट होणार आहे.

टेंभूतून पाणी सोडण्याची सूचना...
विसर्जनानंतर कृष्णा नदीची पाणीपातळी कमी होवून गणेशमूर्ती उघड्या पडण्याचा प्रश्न दरवर्षी भेडसावतो. त्या प्रश्नावर उपाय काढण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि पालिका सतर्क झाली आहे. कृष्णा नदीचे टेंभू योजनेत अडविलेले पाणी तातडीने सोडावे, अशा सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत.

Web Title: Water for immersion; Along with Nirmalya Kalashhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.