Satara: कोयना धरणात पाण्याची आवक वाढली; नवजा ४१, महाबळेश्वरला ४२ मिलीमीटर पावसाची नोंद
By नितीन काळेल | Published: June 26, 2024 07:31 PM2024-06-26T19:31:15+5:302024-06-26T19:31:51+5:30
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून २४ तासांत कोयना येथे ३७, नवजा ४१ आणि ...
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सक्रीय झाला असून २४ तासांत कोयना येथे ३७, नवजा ४१ आणि महाबळेश्वरला ४२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १६.६९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाला. त्यानंतर काही दिवस पूर्व तसेच पश्चिम भागात चांगले पर्जन्यमान झाले. परिणामी खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला. पण, मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह महाबळेश्वर भागातही तुरळक स्वरुपात पाऊस पडत होता. यामुळे पावसाचा जोर कधी वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढत चालला आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३७ मिलीमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत ५७९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत ७६५ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. महाबळेश्वरलाही २४ तासांत ४२ तर जून महिन्यात आतापर्यंत ४९५ मिलीमीटर पाऊस झालेला आहे.
पश्चिम भागात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांतही हळूहळू पाण्याची आवक होऊ लागली आहे. कोयना धरणातही आवक वाढत चालली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात १ हजार ७२४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा १६.६९ टीएमसी झाला होता. मागील आठवड्यापासून धरणात पाणी येत असल्याने धरणसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. तर सध्या धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
सातारा शहरातही मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर शहरवासियांना पावसाचा सामना करावा लागला. तर बुधवारी सकाळच्या सुमारासही रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते.