कोयना धरणात पाण्याची आवक वाढली, पाणीसाठा पोहोचला ९३ टीएमसीवर
By नितीन काळेल | Published: September 30, 2023 05:25 PM2023-09-30T17:25:03+5:302023-09-30T17:25:30+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पाऊस पडत असून कोयना धरणक्षेत्रातही हजेरी लावली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ९३ टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता १२ टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला ३१ तर नवजाला २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला सुरूवात झाली आहे. हा परतीचा पाऊस पडत आहे. तरीही सर्वत्रच पावसाची हजेरी नाही. दररोज कोठे ना कोठे पाऊस होत आहे. शुक्रवारी तर पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोयनेला ३१ मिलीमीटरची झाली आहे. यानंतर नवजा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी २१ मिलीमीटर पर्जन्यमान झाले.
पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शनिवारी सकाळच्या सुमारास ५२५७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास १६०० क्यूसेक वेेग होता. यावरुन धरणातील आवक पावसामुळे वाढल्याने साठाही वाढत चालला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९३.०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यावरुन धरणात ८८.३८ टक्के साठा झाल्याचे स्पष्ट झाले. तर धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. यामधील उरमोडीतील पाणीसाठा चिंताजणक आहे. हे धरण अजुनही ६० टक्के भरलेले नाही. परतीचा पाऊस कितपत पडणार यावर धरणसाठा अवलंबून राहणार आहे. तसेेच पूर्व भागातही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अजुनही बहुतांशी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता वाढलेली आहे.
कोयना पाऊस चार हजारच्या उंबरठ्यावर..
पश्चिम भागात दरवर्षीच पावसाचे प्रमाण अधिक असते. यावर्षी जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५५७२ मिलीमीटर पडलेला आहे. तर महबळेश्वरला ५३६८ मिलीमीटरची नोंद झाली. कोयनानगर येथे यंदा कमी पाऊस झालेला आहे. आतापर्यंत ३९५९ मिलीमीटर पाऊस झाला असून गतवर्षीपेक्षा कमी आहे.