पाणीप्रश्न लवकरच निकाली काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:00+5:302021-09-27T04:42:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : ‘मायणी परिसरातील गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठीचे निवेदन दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. यावेळी या भागातील पाणी प्रश्न लवकरच निकाली काढू,’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सीमा भागातून सोलापूर जिल्ह्यात टेंभू योजनेचे पाणी जात आहे. हे पाणी खटाव तालुक्याच्या कलेढोण गावाच्या हद्दीजवळून जात आहे. तसेच या टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात परिसरातील पाचवड, मुळकवाडी, कलेढोण, अनफळे, पडळ, औतरवाडी, ढोकळवाडी, गारुडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, हिवरवाडी, गारळेवाडी, कठरेवाडी, आगासवाडी या सोळा गावांचा समावेश आहे.
गेल्या दोन दशकांपासून या गावांना शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेक लहान-मोठी आंदोलने केली. तरीही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेली नाही. येथील सोळा गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन टेंभू पाण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढा उभा केला आहे. या लढ्यासाठी एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी दिवड (ता. माण) या ठिकाणी विविध विकासकामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांच्याकडे निवेदन दिले.
परिसरातील सोळा गावांतील ग्रामस्थांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीने निवेदन तयार केले होते. या तयार केलेल्या निवेदनामध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी गावांना द्यावे, पाणी मिळाले तर युवकांचा हाताला रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले होते. संबंधित परिसरातील सोळा गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवेदन दिले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच या भागातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आश्वासन दिले.
(चौकट)
ठोस भूमिका घेणे गरजेचे...
या सोळा गावांतील शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या ठिकाणी कोणतीही ठोस पाणी योजना नाही. त्यामुळे अनेकवेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. तर आलेले पीक जगविण्यासाठी या भागातील शेतकरी प्रसंगी पाणी विकत घेऊन शेती व्यवसाय करतात. त्यामुळे शासनाने या भागातील सोळा गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. तसेच यावर ठोस भूमिका घेणे तितकेच गरजेचे आहे.
२६मायणी
दिवड (ता. माण) येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टेंभू योजनेच्या पाण्यासंदर्भात सोळा गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले.
(छाया : संदीप कुंभार)