कऱ्हाडात ठिय्यानंतर कृष्णा कालव्यात पाणी!
By admin | Published: May 11, 2016 10:04 PM2016-05-11T22:04:52+5:302016-05-12T00:12:44+5:30
स्वाभिमानीचा मोर्चा : पाटबंधारे अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक; दोन तास केले आंदोलन; कार्यकर्ते आक्रमक
कऱ्हाड : कृष्णा कालव्यामध्ये गेल्या ५२ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चाने ते पाटबंधारे कार्यालयावर धडकले. जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत ठिय्या
आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर स्वाभिमानीच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घेऊन दुपारच्या सुमारास कालव्यात पाणी सोडले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कृष्णा कालव्यासाठी ३ टीएमसी पाणी आरक्षित असूनही आजअखेर फक्त १ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा संबंधित पाठबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडून ५२ दिवस उलटूनही पाणी सोडले गेलेले नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाळवा, कऱ्हाड व पलूस तालुक्यांतील पदाधिकारी शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. कऱ्हाड येथील दत्तचौकातून कृष्णा कालवा, सिंचन प्रकल्प पाठबंधारे कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे रूपांतर नंतर ठिय्या आंदोलनामध्ये झाले.
मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मोरे, विकासराव देशमुख, भास्कर कदम, दशरथ पाटील, संदीप चौगुले, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, देवानंद पाटील, बापूसो साळुंखे, प्रकाश देसाई, जयवंत पाटील आदींसह वाळवा, पलूस, कऱ्हाड तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने यावेळी कृष्णा कालवा सिंचन प्रकल्पाचे सहायक अभियंता विकास पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच जोपर्यंत कालव्याला पाणी सोडले जात नाही. तोपर्यंत या ठिकाणाहून उठणार नाही. आधी पाणी सोडा मगच उठू, असा इशारा देत आंदोलकांनी पाठबंधारे कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
यावेळी चर्चेसाठी अधिकारी विकास पाटील आले असता आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणा देण्यात आल्या. चर्चेदरम्यान आंदोलक पाठबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी शिवाजी मोरे, सचिन नलवडे, विकासराव देशमुख, भास्कर कदम आदींसह शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
दुपारी साडेतीन वाजता कालव्यात संबंधित विभागाकडून पाणी सोडण्यात आले असल्याचे सहायक अभियंता पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी दिले.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)
या आहेत मुख्य मागण्या
कृ ष्णा कालव्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जावे.
पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी.
सन २०१६-१७ वर्षाची पाणीपट्टी रद्द करण्यात यावी.
उच्च न्यायालयाने आदेश देऊनही पाणी सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे तत्काळ पाणी सोडावे अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू.