सातारा शहरातील जलवाहिन्यांना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:38 AM2021-03-10T04:38:54+5:302021-03-10T04:38:54+5:30
सातारा : शहरातील जलवाहिन्यांना, तसेच व्हॉल्व्हला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. समर्थ ...
सातारा : शहरातील जलवाहिन्यांना, तसेच व्हॉल्व्हला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. समर्थ मंदिर, बोगदा, शनिवार पेठ व केसरकर पेठ परिसरातील व्हॉल्व्हला सातत्याने गळती लागत आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने अद्याप दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. ही गळती तातडीने काढण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अपघातात वाढ
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरून अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, शिवराज पेट्रोल पंप या ठिकाणी वाहतुकीचे कोणतेच नियोजन नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या परिसरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
कचरा रस्त्यावर
सातारा : सातारा शहर हद्दीत पालिकेची घंटागाडी सकाळीच फिरत असते. ती अकरा वाजेपर्यंत कचरा गोळा करते; पण उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी दोन-दोन दिवस घंटागाडी फिरकत नाही. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकण्याशिवाय पर्यायच नाही. यामुळे अनेक भागांतील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साठलेले पाहायला मिळत आहेत. दुर्गंधीही सुटत असल्याने वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत
सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या मंगळवार पेठ, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा केवळ पंधरा ते वीस मिनिटे पाणी येत असल्याने टाकीही भरत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून केल्या जात आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सातारकरांमधून केली जात आहे.
सुरक्षा कठडे ढासळले
मेढा : महाबळेश्वर-सातारा मार्गावर असलेल्या केळघर घाटातील सुरक्षा कठडे ठिकठिकाणी ढासळले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणे वाहनचालकांना धोक्याचे बनले आहे. तीव्र उतार, तसेच धोकादायक वळण असल्यामुळे अवजड वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
घाणीचा विळखा
सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील चार भिंतींचा परिसर सध्या घाणीच्या विळख्यात सापडला आहे. शाहूनगर परिसरातील अनेक नागरिक येता-जाता रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे या स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सातारा पालिकेने ऐतिहासिक चारभिंती व परिसराच्या स्वच्छतेकडे पाठ फिरविली आहे. हा परिसर कचरामुक्त करावा अथवा याठिकाणी कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फुलझाडांना उभारी
सातारा : शाहू चौक ते रयत शिक्षण संस्था यादरम्यान असणाऱ्या दुभाजकामधील फुलझाडांना उभारी मिळाली आहे. दुभाजकामध्ये वाढलेले गवत व कचरा पालिकेच्या वतीने काढून टाकण्यात आला आहे. ही फुलझाडे पाण्याअभावी कोमेजून चालली होती; परंतु या फुलझाडांना टॅँकरद्वारे पाणी घालण्याचे काम पालिकेने सुरू केल्याने फुलझाडांना नवसंजीवनी मिळाली आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : राजवाडा बसस्थानकासमोर असलेल्या तांदूळ आळीत वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी वाहने, रिक्षा, मालवाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून ये-जा करतात, तर अनेक वाहनधारक रस्त्याकडेला, तसेच दुकानांच्या समोर नो पार्किंगमध्ये वाहने लावत आहेत. अरुंद रस्ता असल्याने या मार्गावरून वाट काढताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या वतीने येथील वाहतुकीबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कारवाईची मागणी
सातारा : सातारा पालिकेच्या वतीने अतिक्रमणांवर कारवाई करूनही विक्रेते व व्यावसायिकांकडून रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. सध्या राजवाडा, राजपथ, गोलबाल, मोतीचौक, खणआळी या परिसरात अनेक विक्रेते व दुकानदारांकडून रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. काही विक्रेत्यांकडून राजपथावरील फुटपाथवर खाद्यपदार्थांच्या गाड्या, तसेच हॉटेलचे फलक लावण्यात आले आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कासला हुल्लडबाजी
पेट्री : जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठार व तलाव परिसराला अनेक हौशी पर्यटक भेट देऊन येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत; परंतु काही युवकांकडून कास तलाव परिसरात मद्य प्राशन करून धांगडधिंगा घालण्याचे प्रकार काही दिवसांपासून वारंवार पाहायला मिळत आहे. सध्या हुल्लडबाज युवकांकडून वणवा लावण्याच्या घटनाही सातत्याने घडू लागल्या आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.