आसनगाव परिसरात पाणी पातळीत घट
By admin | Published: February 8, 2016 10:57 PM2016-02-08T22:57:13+5:302016-02-08T23:24:49+5:30
विहिरी आटल्या : नगदी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत
शेंद्रे : सातारा शहरापासून १५ ते २० किलोमीटरवर असणाऱ्या आसनगाव परिसरात चालू वर्षी चांगला पाऊस न झाल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी तर विहिरी आटल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी दिवसात १० ते १५ मिनिटेच चालत आहेत.
त्यामुळे या परिसरातील विहिरींवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतातील पिके धोक्यात आली आहेत. ऊस, आले तसेच इतर पालेभाज्यांसाठी शेतकऱ्याला जादा पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे आसनगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.
चालू हंगामात शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला तोडून जात आहेत. परंतु येथून पुढे उन्हाळ्यात उसाला व इतर पिकाला पाणी कोढून आणणार या भीतीने शेतकरी आडसाली उस न ठेवता उस पीक शेतातून काढत आहेत. त्यामुळे साखर कारखानाजवळ असूनही या परिसरातील उस पिकाचे प्रमाण कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यावर प्रतिक्रिया विचारली असता मापरवाडी येथील युवा शेतकरी अधिक बाबर म्हणाले, ‘गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी फेब्रुवारी महिन्यातच संपली आहे.
विहिरींमध्ये पाण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. शेतातील पिके वाळू लागली आहेत. (वार्ताहर)