पाणी उशाला... कोरड घशाला!
By Admin | Published: October 15, 2015 10:59 PM2015-10-15T22:59:28+5:302015-10-16T00:57:30+5:30
माण तालुका : बंधाऱ्याला दरवाजे बसविण्याची मागणी
शरद देवकुळे -- पळशी माण तालुक्यातील पळशी येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूरपद्धतीच्या बंधाऱ्याला दरवाजे न बसविल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून, पाण्यावाचून रब्बी हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला तत्काळ दरवाजे बसविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.पळशी येथील तोरशे वस्तीनजीक माणगंगा नदीवर कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत दहा वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. यावर्षी लोधवडे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने माणगंगा नदी वाहू लागली; पण बंधाऱ्याला दरवाजेच नसल्याने पाणी अडवले जात नाही. परिणामी पाण्याचा अपव्यय होत आहे.हा बंधारा सर्वात मोठा असून, पाण्याचा साठा अंदाजे चार-पाच किलोमीटरपर्यंत असल्याने पळशी, जाशी, मणकर्णवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या बंधाऱ्याला दरवाजे बसविले तर हजारो एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते, असे जाणकार सांगतात. बंधाऱ्यात पाणी असूनही ते वाया जात आहे. त्यामुळे ‘पाणी उशाला... कोरड घशाला’ अशी परिस्थती पळशी परिसरात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, कांदा, मका अशा पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्या अद्यापही सुरूच आहेत. जर बंधाऱ्याला दरवाजे बसविले नाहीत, तर रब्बी हंगाम वाया जाऊ शकतो. तरी संबंधित विभागाने त्वरित बंधाऱ्याला दरवाजे बसवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतूमधून जोर धरू लागली आहे.
बंधाऱ्यात पाणी असल्याने वेळोवेळी संबंधित विभागाला याबाबत कळवूनदेखील बंधाऱ्याला दरवाजे बसविले जात नाहीत. यावर्षी नदीला पाणी आले; पण बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-प्रशांत खाडे, शेतकरी, पळशी