महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!
By admin | Published: May 22, 2017 11:12 PM2017-05-22T23:12:51+5:302017-05-22T23:12:51+5:30
महादरे तलावातील पाणी शून्य पातळीवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक असलेल्या महादरे तलावातील पाण्याने शून्य पातळी गाठली. तलावातील गाळ दिसायला लागला असून, तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, तलावातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे नियोजन आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या साताऱ्याला भरभरून निसर्ग संपदा लाभली आहे. यवतेश्वर, अजिंक्यतारा किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून साताऱ्यात मोठी तजवीज करण्यात आली. पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब वापरता यावा म्हणून तलावांची निर्मिती करण्यात आली.
यवतेश्वरवर पडलेल्या पावसाचे पाणी हत्ती तलावात साठते. ते भरल्यानंतर महादरे तलावात पाणी येते. महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एक किलोमीटर अंतर जमिनीतून प्रवास करून पाणी मंगळवार तळ्यात येते अन् पुढे जादा पाणी मोती तळे व प्रतापसिंह हायस्कूलच्या तळघरात येते.
महादरे तलावातून व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ, मंगळवार तळे परिसराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे महादरे तलावाची परिसरातील हजारो नागरिकांना खूप मोलाची मदत होते. या तलावातील पाणी पातळी यंदा चांगलीच खालावली. तलावात उतरण्याच्या पायऱ्या उघड्या पडल्या असून, पश्चिम दिशेने जमीन उघडी पडली. त्यामुळे तलावातून होणारा पाणीपुरवठा पालिकेला बंद करावा लागला आहे. व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ व मंगळवार तळे परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कासचे पाणी दिले जात आहे.