वसना योजनेचं पाणी हवंय..पण फुकट नाही !
By Admin | Published: December 9, 2015 11:56 PM2015-12-09T23:56:51+5:302015-12-10T01:01:15+5:30
कोरेगाव तालुका : शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरावा; शासनाची भूमिका
संजय कदम-- वाठार स्टेशन --दुष्काळ पडलाय... शेतीला पाणी न्हाय... आतातरी पाणी सोडा... अशी साद गेल्या अनेक वर्षांपासून वसनाकाठचा शेतकरी मारत आहे. मात्र वसनेचं पाणी आता फुकट मिळणार नाही तर त्यासाठी शेतकऱ्यांना दोन पावलं पुढं टाकावीत आणि पाण्यासाठी रितसर पाणी मागणी अर्ज भरावा. तरच हे पाणी शेताला मिळेल, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. त्यामुळे वसनेचं पाणी मोकळं सुटण्याच्या आशा आता मावळल्या आहेत. कोरेगावच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या परिश्रमातून १९९८ मध्ये कोरेगावच्या उत्तर दुष्काळी भागाला हरित स्वप्न दाखवणारी वसना उपसा सिंचन योजना खऱ्या अर्थाने कागदावर आली. युती शासनाच्या काळात या योजनेचा शुभारंभ रेवडी गावच्या हद्दीत झाला. सुरुवातील तीन टप्यात असलेली ही ०.९२ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजना बीओटी तत्त्वावर बांधण्यास मंजुरी मिळाली. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने यात बदल घडवत दोन टप्यात या योजनेला मान्यता दिली. दि. ९ मे २००० रोजी शरद पवार यांच्या मूळगावात या योजनेची कोनशीला उभारण्यात आली. यावेळी अवघ्या ७२ कोटींत पूर्ण होणारी ही योजना आज शासनाच्या उदासिन भूमिकेमुळे १५० कोटींच्या घरात पोहोचली आहे. ती आता सर्वांसाठीच दिवास्वप्न ठरू लागली आहे. दरम्यान, वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ काही वर्षांपूर्वीच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर या टप्यातील सहा गावांना या योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण होते. आताही पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी या योजनेतून पूर्वी प्रमाणेच सर्वच गावांतील ओढ्या-नाल्यांना पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.
दरम्यान, आमदार आदर्श ग्राम योजनेत देऊरचा सहभाग झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊरला आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार वसनेच्या पहिल्या टप्यातील पाणी एका चेंबरमधून देऊरमधील एका ओढ्यातून ७५० अश्वशक्तीच्या मोटारीद्वारे गेल्या सोमवारपासून सोडण्यास सुरुवात केली. परंतु भारनियमनामुळे मंगळवारी हे पाणी बंद होते. बुधवारी पुन्हा दुपारी १ ते ४ या वेळेत सोडले होते. मात्र पाण्याची गरज सर्वांनाच असल्याने या योजनेतील इतर गावांतील शेतकऱ्यांनीही ते आपल्या शेतात सोडण्यासाठी या पाईपलाईनची तोडफोड करण्याचा प्रकार केल्याने हे पाणी बंद ठेवले आहे.
धोम पाटबंधारे विभागाची सूचना
पाणी सोडण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरावेत. पाणी वापर संस्थांची निर्मिती करावी. ती केल्यास या योजनेतून पाणी सोडणे शक्य होणार आहे. मात्र ओढ्यानाल्यांना मोकळे पाणी सोडणं हे न परवडणार असल्याने शेतकऱ्यांनी या पाण्याची मागणी विहित नमुन्यातच करणे गरजेचे आहे, अशी सूचना धोम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.