नीरा-देवघरचे पाणी शेखमीरेवाडीत खळाळणार
By admin | Published: January 21, 2017 09:00 PM2017-01-21T21:00:51+5:302017-01-21T21:00:51+5:30
मकरंद पाटील : कालव्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण करू नये
खंडाळा : ‘नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्राखालील गावांना मिळावे. यासाठी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले. कालव्याच्या कामातील अनेक तांत्रिक अडचणींवर मात करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याद्वारे येत्या चार दिवसांत पाणी शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचेल,’ अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
खंडाळा येथील ११ गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘नीरा-देवघर कालव्याद्वारे खंडाळा तालुक्यातील २४ गावे लाभक्षेत्रात येत आहेत. या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. याची जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच ठेवली आहे. मात्र, या कालव्यात अनेक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी बराच अवधी गेला. विशेषत: सांगवी येथील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम वनविभागाच्या जागेची परवानगी त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटर कालव्याचे क्रॉसिंग करण्यासाठी येथील जमिनीतील २४० खातेदारांचा शोध घेण्याची मोहीम राबवावी लागली.
ही क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या भावनेचा आदर करून येत्या चार दिवसांत प्रजासत्ताक दिनापर्यंत पाणी ४८ किलोमीटर शेखमीरेवाडीपर्यंत पोहोचले जाईल. तालुक्यातील बहुतांशी कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. वाघोशीपर्यंत पाणी पोहोच-विण्यासाठी मोर्वे येथील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या जातील.
यावेळी सभापती नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, यशवंत साळुंखे, अजय भोसले, लक्ष्मण चव्हाण, मयूर भोसले, राजेंद्र भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पोटपाटाची कामे मार्चनंतर सुरू...
‘मोर्वे गावच्या हद्दीतील दोन किलोमीटर अंतरातील कालव्याचे कामही येत्या काही दिवसांत वेगाने करण्यात येईल.’ ते पूर्ण होताच वाघोशीपर्यंत पाणी जाण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. याशिवाय या कालव्याच्या पोटपाटाची कामेही मार्चनंतर हाती घेण्यात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. या परिसरातील गावांनी, शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. या कालव्याच्या कामाबाबात कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले.