नीरा-देवघरचे पाणी चुकीच्या पद्धतीने बारामतीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:39 AM2021-03-26T04:39:02+5:302021-03-26T04:39:02+5:30
फलटण : ‘नीरा-देवघर कालव्याची कामे होण्याबाबत व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य शासन उदासीन असल्याने हे प्रकल्प रखडले आहे. तसेच ...
फलटण : ‘नीरा-देवघर कालव्याची कामे होण्याबाबत व कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य शासन उदासीन असल्याने हे प्रकल्प रखडले आहे. तसेच नीरा-देवघरचे पाणी चुकीच्या पद्धतीने बारामतीला नेले जात आहे,’ अशी नाराजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
गिरवी, ता. फलटण येथे दिगंबर आगवणे यांच्या निवासस्थानी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मोहिते-पाटील म्हणाले, ‘मी उपमुख्यमंत्री असताना मंजूर केलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असून, राज्य सरकार मात्र उदासीन आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी तातडीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास मंजुरी दिलेली होती. परंतु विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास निधी न देऊन उदासीनता दाखवलेली आहे. आगामी काळामध्ये कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी आम्ही तयार आहोत.’
फलटण व माळशिरस तालुक्यांचा दुष्काळ दूर करणारा आणि गेल्या बर्याच वर्षांपासून रखडलेला नीरा-देवधर प्रकल्पाला निधी देण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प आगामी काळात लवकर होणे गरजेचे आहे. पूर्वीप्रमाणे कालवे न होता, आता बंदिस्त पाईपलाइनद्वारे नीरा-देवधर प्रकल्पाचे काम होणार आहे. याचे पाणी बारामतीला कारण नसताना नेले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकार अर्धवट प्रकल्पांना निधी देऊ शकत नाही नीरा-देवधर व कृष्णा -भीमा स्थिरीकरण प्रकल्प होणेबाबत केंद्र सरकार पातळीवरही आम्ही प्रयत्न केलेले आहेत. पाणी प्रश्न सुटावा म्हणूणच आम्ही भाजप प्रवेश केला होता. केंद्राची सहकार्याची भूमिका आहे; परंतु केंद्र सरकार हे अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे आगामी काळात या प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधी मिळणे गरजेचे आहे. पाणी प्रश्नांमध्ये राज्य सरकारने राजकारण आणू नये तसेच जनता अडचणीत असताना वीजबिले भरली नाही म्हणून त्यांची वीज पुरवठा खंडित करण्याचा चुकीचा प्रकार सुरू असल्याबद्दल मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
(चौकट)
वीज मंडळाला टाळे ठोकणार : आगवणे
लाईट बिल भरले नाहीत म्हणून वीज मंडळ गोरगरिबांचे वीजपुरठा खंडित करत असून, शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मवरीलही कनेक्शन कट केले जात आहे. महावितरणने जनतेला दिलासा द्यावा, कोणाचेही वीजपुरवठा खंडित करू नये, अन्यथा येथील वीजवितरण कार्यालयात टाळे ठोकण्याचा इशारा दिगंबर आगवणे यांनी यावेळी दिला.