टेंभूच्या अधिकाऱ्यांना पाजले दूषित पाणी
By admin | Published: February 2, 2015 10:48 PM2015-02-02T22:48:06+5:302015-02-02T23:45:58+5:30
बोंबाबोंब आंदोलन : अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे कऱ्हाडमध्ये ‘मनसे’चे कृत्य; साथीचे रोग होत असल्याचा आरोप
कऱ्हाड : टेंभू उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत कृष्णेचे पाणी अडविल्याने कऱ्हाडसह सैदापूर, हजारमाची, ओगलेवाडीसह सतरा गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ त्याचा निषेध म्हणून सोमवारी (दि. २) येथील टेंभू उपसा योजनेच्या कार्यालयासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंंब आंदोलन केले़ यावेळी काहींनी अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना हे दूषित पाणी पाजले़ त्यामुळे येथील वातावरणही दूषित झाले आहे़ कृष्णा नदीपात्रावर टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प राबविण्यात आला आहे़ त्याअंतर्गत टेंभू येथे पाणी अडवून तेथून ते पाणी उचलून सांगली जिल्ह्यातील गावांना दिले जाते़ मात्र, हे पाणी अडविल्याने कृष्णा नदीपात्राचा प्रवाह थांबला जातो़ त्याचा विपरीत परिणाम कऱ्हाडसह परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्यावरती होत आहे़ कृष्णेच्या पाण्यात कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषदेचे सांडपाणी सोडले जाते़ त्यामुळे अडवून ठेवलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत आहे़ साहजिकच नदीकाठावर असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून हेच पाणी लोकांना पिण्यासाठी मिळत आहे़ परिणामी, लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे़ याबाबत ‘मनसे’ने आक्रमक पवित्रा घेत सोमवारी ओगलेवाडी येथील टेंभूच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले, तर काहींनी अधिकाऱ्यांनाच हे पाणी पाजले़
आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड़ विकास पवार, महेश जगताप, रवींंद्र शेलार, दादा शिंगण, सागर बर्गे, चंद्रकांत पवार, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, नितीन महाडिक, आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)
बैठक घेण्याचे आश्वासन -- दरम्यान, कऱ्हाड व मलकापूर नगरपरिषद, कृष्णा हॉस्पिटल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचे लेखी आश्वासन टेंभूच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनाला स्वल्पविराम मिळाला आहे़