बामणवाडीत तीन दिवसांतून एकदा पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:19+5:302021-04-24T04:39:19+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील बामणवाडी-वानरवाडीला सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. दोन-तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला, तरी पुरेसे पाणी मिळत नसल्याने जादा टँकरची मागणी केली जात आहे.
बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी येथील पाझर तलाव दुरुस्तीचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. तलावातील संपूर्ण पाणी सोडून देण्यात आले आहे. अवकाळी पावसानेही ओढ दिल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे स्रोत बंद झाले आहेत. वानरवाडी आणि बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामणवाडी, शिबेवाडी आणि पवारवाडी या चार गावच्या पाणीपुरवठा विहिरीचे पाणी संपुष्टात आले आहे. परिणामी, जणावरांसह पिण्याच्या, खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
दहा दिवसांपासून वानरवाडी येथील पाणीपुरवठा विहिरीत दररोज दहा हजार लीटरचे दोन टँकर पाणी सोडले जात आहे.
बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पवारवाडी, शिबेवाडी-कारंडेवाडी विहिरीत एक तर बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडीतील विहिरीत दोन टँकर पाणी दररोज सोडले जात आहे, तरीही बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी या प्रत्येकी गावांत एकएक दिवस पाणी सोडले जात असल्याने, प्रत्येक गावात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
बारमाही पाणीसाठा असलेल्या वानरवाडी पाझर तलावाखालील ओड्यावर सात वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत.
बागायती शेतीसाठी खणण्यात आलेल्या विहिरींची संख्या तीसहून अधिक आहे. या तलावात कायम स्वरूपी पाणीसाठा असल्याने, या विहिरींचे जलस्रोत उन्हाळ्यात ही थोड्या प्रमाणात सुरू असतात. मात्र, दुरुस्तीसाठी तलावातील पाणी सोडून दिल्याने सर्वच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांसह पिण्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
चौकट :
बामणवाडीसह ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सर्व वाड्यांची कायमस्वरूपी पाणी समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वांग नदीवरून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम दोन वर्षांपासून राजकीय श्रेयवादात रखडले आहे.
चौकट :
बारमाही पाणीसाठा टिकून राहत असलेला वानरवाडी येथील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ करण्याच्या हेतूने तलावातील गाळ काढणे, भिंतीची वाढ करण्यासाठी आठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाखालील गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचीही मोठा प्रश्न सुटणार आहे.