घरांसह जनावरांच्या शेडमध्ये पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:19+5:302021-06-18T04:27:19+5:30
तांबवे : म्होप्रे (ता. कऱ्हाड) येथे महामार्गानजीक साचलेले पाणी घरे तसेच जनावरांच्या शेडमध्ये घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांसह पाळीव जनावरांच्या निवाऱ्याचा ...
तांबवे : म्होप्रे (ता. कऱ्हाड) येथे महामार्गानजीक साचलेले पाणी घरे तसेच जनावरांच्या शेडमध्ये घुसले. त्यामुळे शेतकऱ्यांसह पाळीव जनावरांच्या निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत म्होप्रे येथे वस्ती आहे. सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कऱ्हाड ते पाटण रस्त्याचे काम एका कंपनीने घेतले असून, त्या कंपनीने सबठेकेदार नेमले आहेत. त्या ठेकेदाराच्या बेजबाबदार कामकाजामुळे म्होप्रे येथील महामार्गालगतच्या वस्तीत राहणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी या वस्तीतील घरांमध्ये शिरले आहे. तसेच जनावरांच्या शेडमध्येही पाण्याचे तळे साचले आहे. कोरोना परिस्थितीतच ही समस्या उद्भवल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महामार्गानजीक असलेल्या गटारातील पाणी वाहून जाण्यासाठी योग्य ती उपाययोजना न केल्यामुळे ते पाणी तसेच तुंबून राहत आहे. गटार तुंबल्यामुळे पाणी वस्तीमध्ये घुसत आहेत. ठेकेदाराच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर साठे यांनी केला आहे.
फोटो : १७ केआरडी ०९
कॅप्शन : म्होप्रे (ता. कऱ्हाड) येथे महामार्गालगत असलेल्या वस्तीत जनावरांच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.