प्राधिकरण पाजतंय थकबाकीचं पाणी ! ग्राहकांची धावपळ; नियमित बिल भरणाºयाला बहात्तर हजारांचा ‘झटका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:23 PM2018-01-01T23:23:38+5:302018-01-01T23:23:55+5:30
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माध्यमातून अ‘नियमित’ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायमच येत असतात. आता तर
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या माध्यमातून अ‘नियमित’ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायमच येत असतात. आता तर नियमित बिल भरणाºया ग्राहकांना मोठ्या रकमांच्या थकबाकीची बिले पाठवून त्यांना बेजार करण्याचा उद्योग सुरू झाला आहे. शाहूपुरीतील वीज ग्राहकाने मागील महिन्याचे बिल भरूनही त्यांना ७१ हजार ७६० रुपयांच्या थकबाकीचे बिल पाठविण्यात आले आहे. हे बिल पाहून कटके यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले.
परशुराम कटके व रामचंद्र अण्णा शिंदे यांनी २० वर्षांपूर्वी शाहूपुरीतील चैतन्य कॉलनीमध्ये एकत्रित प्लॉट खरेदी केला होता. प्राधिकरणामार्फत शिंदे यांनी नळकनेक्शन घेतले. परशुराम कटकेही या पाण्याचा वापर करतात. याच कनेक्शनची बिले अनेकदा वाढवून पाठविले जात आहेत.
नळांना मीटर लावल्यापासून प्राधिकरणाचा भोंगळ कारभार समोर येऊ लागला आहे.
संबंधित ग्राहकाची चालू देय रक्कम ५६७ रुपये आहे. मागील थकबाकी ६८ हजार ४४४ इतकी दाखवून थकबाकीवरील अधिभारासह तब्बल ७१ हजार ७६० रुपयांचे बिल त्यांना पाठविण्यात आले. १५ जानेवारी २०१८ पर्यंत हे बिल भरावे लागणार असल्याने परशुराम कटके यांनी प्राधिकरण कार्यालयाकडे धाव घेतली. प्रमाणापेक्षा जास्त आलेले बील तत्काळ बदलून देण्याची मागणी करण्यात आली.
प्राधिकरण कार्यालयात हेलपाटे
शाहूपुरीतून प्राधिकरण कार्यालयात येण्यासाठी स्पेशल रिक्षा केल्यास त्याचे भाडे २०० रुपयांच्या आसपास जाते. हे वाचवण्यासाठी पहिल्यांदा शाहूपुरीतून रिक्षाने राजवाड्यावर जायचे व तिथून दुसरी रिक्षा पकडून पोवईनाक्यावर मग तिथून चालत प्राधिकरण कार्यालयात जावे लागते. असा प्रवास करायचा म्हटले तरी साधारणत: ४० रुपये लागताच. बिल कमी करण्यासाठी पदरमोड करून जावे लागते. कार्यालयात जाऊन अधिकाºयांच्या मिन्नतवाºया करायच्या, त्यानंतर बिल कमी केले जाते. मात्र खर्च होणारे रिक्षाचे भाडे आणि होणारा मानसिक त्रास याचे काय करायचे?, असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.
मी गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा ग्राहक आहे. चार ते पाच बिले व्यवस्थित येतात; परंतु त्यानंतर अधूनमधून वाढीव रकमेची बिले मिळतात. मग ही बिले कमी करण्यासाठी कामधंदा सोडून प्राधिकरणाचे कार्यालय गाठावे लागते, हा मन:स्ताप थांबावा, अशी माझी इच्छा आहे.
- परशुराम कटके, ग्राहक, शाहूपुरी