ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न बनला गंभीर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:23+5:302021-07-05T04:24:23+5:30
कोपर्डे हवेली : उत्तर कोपर्डे ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी थकीत बिलामुळे वीज वितरण कंपनीने बंद ...
कोपर्डे हवेली : उत्तर कोपर्डे ता. कऱ्हाड येथील ग्रामपंचायतीचे नळ पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी थकीत बिलामुळे वीज वितरण कंपनीने बंद केली. यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीचा महसूल कोरोनामुळे अनेकांनी भरला नसल्याने ग्रामपंचायतीकडे महसूल गोळा झाला नाही. महसूल गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने हवे तसे प्रयत्न केले नाहीत. अलीकडच्या काही वर्षांतच नवीन ग्रामपंचायत उत्तर कोपर्डे येथे अस्तित्वात आली आहे. ग्रामपंचायतीचे भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळ जास्त आहे, तर लोकसंख्या कमी आहे. त्यातच बाहेरील लोकांचे वास्तव्य जास्त त्यामुळे महसूल कमी गोळा होतो. काहीजण अनेक वर्षोचे थकबाकीदार गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे. वसुलीसाठी म्हणावे तसे प्रयत्न केले जात नाहीत. चक्क उपसरपंच आणि शिपायाचे मानधन तीन वर्षांपासून थकीत आहे. सदस्यांचा कार्यकाल संपल्यांने वसुलीसाठी कोणीही पुढे येत नाहीत.
अगोदर पथदिवे गावात नाही तर ऐन पावसाळ्यात कृष्णाकाठच्या गावात पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल असल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
कोट
प्रशासक आणि ग्रामसेवक यांचा समन्वय नाही. गावातील अडचणीसाठी मी वरिष्ठांशी बोलतो आहे. यावर पर्याय निघाला नाही तर मी उपोषणाला बसणार आहे.
- वसंतराव चव्हाण,
माजी उपसरपंच उत्तर कोपर्डे.