दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी

By नितीन काळेल | Published: August 21, 2023 06:51 PM2023-08-21T18:51:17+5:302023-08-21T18:53:12+5:30

अधिकाऱ्यांपुढे मांडले गाऱ्हाणे 

Water problem in Man taluka, Demand of villagers to provide water and crop insurance for temple | दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी

दुष्काळाचे ढग! माणच्या शेतकऱ्यांची चारा-पाण्यासाठी साताऱ्यात धडक; टेंभूचे पाणी, पीक विमा देण्याची मागणी

googlenewsNext

सातारा : माण तालुक्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला असून प्यायला पाणी आणि जनावरांना चारा नाही. त्यामुळे दुष्काळाचे ढग दाटत असल्याने तालुक्यातील वरकुटे मलवडी, कुरणेवाडी, बनगरवाडी आणि महाबळेश्वरवाडीच्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी साताऱ्यात धडक मारली. पालकमंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना भेटून चारा आणि पिण्याच्या पाण्याची मागणी केली. तसेच टेंभू योजनेचे पाणी सोडणे आणि पीक विमा रक्कम लवकर देण्याचीही मागणी करण्यात आली.

पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. तरीही माण तालुक्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. सध्या निम्म्या तालुक्याला टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर जनवारांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झालेला आहे. विकतचा चारा परवडेनासा झाला आहे. यामुळे जनवारांसाठी चारा छावण्या सुरू तसेच पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. यातूनच वरकुटे मलवडी परिसरातील चार गावचे शेतकरी सोमवारी साताऱ्यात आले होते. या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही निवेदन देत आपल्या भावना मांडल्या.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आले होते. यामध्ये संजय जगताप, विजय जगताप, विक्रम शिंगाडे, सतीश जगताप, अंकुश गाढवे, किरण खवळे, कुबेर आटपाडकर, विलास आटपाडकर, बंडू आटपाडकर, दिगंबर जगताप, भागवत पिसे, सुनील थाेरात, नाथा गळवे, चंद्रकांत कोठावळे, दिलीप आटपाडकर, सीताराम आटपाडकर, दत्तात्रय नरळे, महावीर काटकर, संदीप खरात, गोटू आटपाडकर, लक्ष्मण आटपाडकर आदी सहभागी झाले होते.

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माण तालुक्याच्या पूर्वेकडील वरकुटे मलवडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी, बनगरवाडी आणि काळचाैंडी या गावच्या पाणीपुरवठा विहिरी या महाबळेश्वरवाडी तलावावर अवलंबून आहेत. सध्या हा तलाव कोरडा पडलेला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठलाय. गावांना पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. या तलाव्यात पाणी सोडण्यासाठी टेंभू योजनेतून दोन ठिकाणी पाईपलाईन जोडलेल्या आहेत. त्यामधील कोरेवाडी, लाडेवाडीला पाणी साेडले जाते. मात्र, अनेक छोटे तलाव भरल्यानंतर पाणी महाबळेश्वरवाडी तलावात येते. या लाइनवरील सर्व तलाव भरुन दिल्यानंतर टेंभूचे पाणी सोडण्याचे दुसरे ठिकाण हांडेवास्ती आहे. या हांडेवस्तीवरील पाणीपुरवठा व्हाॅल्वमधून महाबळेश्वरवाडी तलावात पाणी सोडावे ही विनंती आहे.

कुरणेवाडी गावासाठी टेंभू योजनेचे पाणी पडळकर खडक तलावात सोडावे. कारण, या भागात प्रचंड दुष्काळ आहे. सध्यस्थितीत गावासाठी पाणी टॅंकरही सुरू आहे. टेंभू योजनेतून सीमेवरील सांगली जिल्ह्यात पाणी सोडले जात आहे. पण, सातारा जिल्ह्यातील कुरणेवाडीसाठी टेंभूचे पाणी सोडत नाहीत. यामुळे लोक दुष्काळाने होरपळत आहेत. त्यातच कुरणेवाडी ग्रामस्थांना दुषित पाणीपुरवठा केला जातोय. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. याची दखल घेऊन कुरणेवाडीसाठी टेंभू योजनेचे पाणी सोडावे. नाहीतर आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.

Web Title: Water problem in Man taluka, Demand of villagers to provide water and crop insurance for temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.