पाणी ओसरतंय... आता काळजी साथरोगांची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:06+5:302021-07-27T04:41:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने ...

The water is receding ... now take care of communicable diseases! | पाणी ओसरतंय... आता काळजी साथरोगांची!

पाणी ओसरतंय... आता काळजी साथरोगांची!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पात्र सोडून बेफाम वाहणाऱ्या नद्यांचे पाणी घाण वाहून आणते. या घाण पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टो स्पिरोसिसचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळीच काळजी घेऊन उपचार घेतले तर साथीच्या रोगांपासूनही बचाव होण्यास मदत होते.

अतिवृष्टीने साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर आणि कोकणातही हाहाकार माजवला आहे. तब्बल पाच दिवस निव्वळ पाण्याचं साम्राज्य पाहणाऱ्या या जिल्ह्यातील पावसाचे पाणी आता ओसरू लागले आहे. ओसरणारे हे पाणी मानवाला हानी पोहोचवणारे ठरू शकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांना शिधा, कोरडे कपडे यासह बाटलीबंद पाणी उपलब्ध करून दिले तर त्यांचे आरोग्य राखण्यास उपुयक्त ठरते. पुरात अडकून पडलेल्यांनीही आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपचार घेणे महत्त्वाचे ठरत आहे.

चौकट :

लेप्टो स्पिरोसिस म्हणजे नेमकं काय?

नदीपात्राचा प्रवाह सोडून पुराचे पाणी आपल्या आजूबाजूची घाण घेऊन पुढे जात असते. या घाण पाण्यातून त्वचेच्या मार्गे लेप्टो स्पिरोसिसचे जंतू शरीरात प्रवेश करून किडनी आणि लिव्हरवर हल्ला चढवितात. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हा त्रास जीवघेणाही ठरू शकतो.

असं होत असेल तर काळजी घ्या

पुराचे पाणी खाली ओसरत असतानाच वातावरणातील जिवाणू आणि विषाणू सक्रिय अवस्थेत असतात. त्यामुळे ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे, जुलाब आणि काविळीची लक्षणे आढळून आली तर तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओल्या कपड्यांच्या वापराने त्वचेचा संसर्ग आणि साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू-मलेरिया होण्याची शक्यताही अधिक असते.

पुराचं पाणी घाण का?

नदीपात्राच्या शेजारी उभं राहिल्यानंतर त्या पात्रातून दुर्गंधी येत नाही, कारण हे पाणी वाहत असते. मात्र, पूरपरिस्थितीत पात्र सोडून नदी वाहू लागते. पाण्याचा प्रवाह इतका बलाढ्य असतो की, वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट या पाण्यात सामावून जाते. मोठमोठी झाडे, त्यावर विसावणारे पशु, पक्षी, पाळीव प्राणी, मैला हे सगळंच वाहून येते. पाण्यात अधिक काळ राहिल्याने त्या कुजायला सुरुवात होते. सजीवाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरावर तयार होणारे जिवाणू किटाणू सहजपणे या पाण्यातून प्रवाहित होऊन मानवाला बाधा पोहोचवतात.

कोट :

पूरग्रस्त परिस्थितीत राहिलेल्यांना जंतू आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती असते. त्यामुळे पुराचे पाणी ओसरू लागले की तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि काही लक्षणं दिसत असतील तर अंगावर आजार न काढता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- डॉ. प्रतापराव गोळे, सातारा.

Web Title: The water is receding ... now take care of communicable diseases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.