Satara: कोयना धरणातून पुन्हा पाणी सोडले, पावसामुळे आवक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:50 PM2024-10-17T15:50:55+5:302024-10-17T15:51:25+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस अजूनही पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पाऊस होत आहे. यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच ओढे खळाळून वाहत आहेत. तसेच पश्चिम भागातही पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात सुमारे अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा १०४.८२ टीएमसी झाला होता. पाणीसाठ्याची टक्केवारी ९९.५९ झाली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. त्यातून १ हजार ५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरलाही २८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ८१७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यानंतर महाबळेश्वरला ६ हजार ५७० आणि कोयना येथे ५ हजार ६९६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम भागातील कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे भरलेली आहेत. सध्या या सर्वच धरणांत १४८ टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे.