कृष्णा कालव्यात पाणी सोडले; सातारा, सांगलीच्या चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:01 IST2025-04-09T13:00:59+5:302025-04-09T13:01:58+5:30

पिकांना संजीवनी 

Water released into Krishna Canal Agricultural areas in four talukas of Satara and Sangli benefit | कृष्णा कालव्यात पाणी सोडले; सातारा, सांगलीच्या चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

कृष्णा कालव्यात पाणी सोडले; सातारा, सांगलीच्या चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

कऱ्हाड : कऱ्हाडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने सोमवारपासून कालव्यात २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, या आवर्तनाचा कालावधी २५ दिवसांचा आहे. त्यामुळे चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात संजीवनी मिळणार आहे.

कऱ्हाड तालुक्यात खोडशी येथे कृष्णा नदीवरून कॅनॉलला प्रारंभ झाला आहे. हा कालवा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील ३४ गावातून वाहत जाऊन येरळाला मिळतो. सुमारे ८६ किलोमीटर लांबीच्या या कॅनॉलवर शेती, पशुधन तसेच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे. ३४ गावे व सुमारे १३ हजार ३६० हेक्टर शेतीक्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. गत महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सध्या कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होती. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे तसेच पाणी नसल्यामुळे पिके होरपळत होती. त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता सोमवारपासून कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा कॅनॉलमध्ये विसर्ग केला जात असून, हे पाणी कऱ्हाडसह चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला संजीवनी देणारे ठरणार आहे. २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बी. आर. पाटील यांनी दिली.

चार स्टेशनवर पाण्याची उपलब्धता

कृष्णा कॅनॉलचे चार स्टेशन आहेत. या स्टेशननुसार पाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना करून दिली जाणार आहे. नियोजनानुसार सांगली जिल्ह्यातील येळावीला सुरुवातीला पाणी उपलब्ध होणार असून, त्यानंतर किर्लाेस्करवाडी, ताकारी आणि अखेरच्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यातील शेणोली स्टेशनअंतर्गत शेतीला पाणी पुरवठा होणार आहे.

कृष्णा कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतजमिनीला पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. सोमवारपासून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले असून, २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढेही नियोजनानुसार पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. - बी. आर. पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग, कऱ्हाड

Web Title: Water released into Krishna Canal Agricultural areas in four talukas of Satara and Sangli benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.