खंडाळ्यात जलक्रांती; तलाव भरले तुडुंब...
By admin | Published: September 25, 2016 11:44 PM2016-09-25T23:44:34+5:302016-09-26T00:13:32+5:30
हरितक्रांतीचे बीज रोवले : ‘जलयुक्त’च्या कामामुळे शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी; गावोगावची पाणीटंचाई दूर
खंडाळा : तालुक्यात दरवर्षी गावोगावी जाणवणारी भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून भरीव काम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात झालेल्या पावसाने सर्वच ठिकाणचे तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. लोकसहभाग, जलयुक्त योजनेतील कामाने तालुक्यात जलक्रांती झाली असून, त्या माध्यमातून शेती पाण्याचाही प्रश्न मार्गी लागल्याने हरितक्रांतीचे बीज रोवले गेले आहे.
खंडाळा तालुक्यातील विविध गावांना गेल्यावर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते. त्यामुळे पुढील काळात अशी पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत लोकसहभागातून धरणे, तलाव, बंधारे यातील गाळ काढून खोलीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली होती.
तालुक्यातील खेड बु।। येथील तुळशी वृंदावन धरणासह, कण्हेरी, बावडा, म्हावशी, धावडवाडी, विंग, अजनूज, भादे, घाटदरे, हरळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम केले गेले. तर काही गावांमध्ये नवीन बंधारे लोकसहभागातून बांधले गेले. तसेच शासनाच्या लघुपाटबंधारे विभागातून सिमेंट बंधारेही बनविण्यात आल्याचे जलसंधारणाच्या कामात मोठी क्रांती घडून आली. यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही पाऊल उचलले होते.
पावसाळ्यानंतर याच तलावातमधून पाणी साठल्याने कधीकाळी कोरडे पडणारे हे पाणीसाठे तुडुंब भरले आहेत. लोकांना त्यांच्याच केलेल्या कामाची पावती निसर्गाने दिल्याने मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. शिवारातील बंधाऱ्यामधून पाणी साठल्याने त्या परिसरातील विहिरी कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फायदा सध्या खरीप हंगामातील पिकांनाही होत आहे. सध्या सर्वत्र पावसाने ओढ दिली असली तरी शिवारात पाणी असल्याने पिके जोमात आहेत. धान्य पिकांचे उत्पादनात वाढ होेणार असल्याने ही हरितक्रांतीची बीजे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. पाण्यामुळे सर्व गावातून शिवारं जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील वर्षी पाणीटंचाईची समस्या आता भासणार नाही. जलसंधारणातील हेच काम औद्योगिकसह कृषी क्षेत्रातही योगदान देणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे, तलाव यातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही काम केले. ज्या गावातून मागणी झाली तेथे भरीव काम झाले. हजारो ब्रास माती गाळ काढल्याने पाणीसाठवणीबरोबर खडकाळ माळरानही ओलिताखाली आल्याचे दिसून येत आहे.
-शिवाजीराव तळपे, तहसीलदार
बावडा गावामध्ये लोकसहभागातून धरणतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. तालुक्यातील सर्वाधिक प्रमाणात गाळ या गावात काढण्यात आला. ओढाजोड प्रकल्पामुळे सध्या धरण तुडुंब भरले आहे. पाणीसाठा वाढल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीपाणी दोन्ही बाजू भक्कम आहेत.
- मनोज पवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती