कासच्या सांडव्यावरून वाहू लागले पाणी, सातारकरांची मिटली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:39 PM2018-07-05T14:39:48+5:302018-07-05T14:42:34+5:30
साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे.
पेट्री (सातारा) : साताऱ्याला पाणीपुरवठा करीत असलेला कास तलाव दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरला. तलावाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटे सात वाजल्यापासून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता सातारकरांची पाण्याची चिंता वर्षभरासाठी मिटली आहे.
दरम्यान कण्हेर तसेच उरमोडी धरणाच्या पाणीपातळीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन भांबवली तसेच एकीवचा धबधबाही मोठ्या प्रमाणावर कोसळू लागला आहे.
यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावत दोन-तीन वेळा पडलेल्या मुसळधार पावसातच तलावातील पाणीसाठा पाच फुटाने वाढला होता. त्यानंतर पावसाने काही दिवस उसंत घेत कमी अधिक प्रमाणात पावसाची रिमझिम सुरू होती.
यावेळी तलावाच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ होत मंगळवारी सकाळपर्यंत सतरा फुटांपर्यंत पाणी पातळी झाली होती. दरम्यान मागील आठवड्यात या परिसरात उनाचे देखील अधूनमधून दर्शन होत होते. मंगळवारपासून पावसाने जोर धरत गुरुवारी पहाटेपासून तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.
जून निम्मा संपला तरी साताऱ्याच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस पाणी पातळीत कमालीची घट होऊन कासचा पाणीसाठा सहा फुटांवर आला होता. यंदाही २००३ ची पुनरावृत्ती होते की काय? अशी काळजी लागून राहिली होती.
कास परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला. पहिल्याच दोन दिवसांच्या पावसात पाच फुटाने पाणीसाठा वाढला होता. त्यानंतर पावसाचा काहीसा जोर ओसरून अगदी काही दिवसांत दोन फुटांनी वाढ झाली होती. पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावत अर्धा टीएमसीच्या आसपास क्षमता असणारा कास तलाव पूर्णपणे भरत ओव्हरफ्लो झाला आहे.