सर्व्हिसिंग सेंटरमध्येही पाणीबचत मोहीम
By admin | Published: May 11, 2016 10:31 PM2016-05-11T22:31:43+5:302016-05-12T00:02:08+5:30
जलसाक्षरता वाढतेय : कमी पाण्यात धुतली जातायत वाहने -- लोकमत जलमित्र अभियान
सातारा : एखादी वस्तू आपल्याकडे मुबलक प्रमाणात असले किंवा ती विनामूल्य मिळत असेल तर तिचे महत्त्व राहत नाही. पाण्याच्या बाबतीतही असेच घडले आहे. जेव्हा होतं तेव्हा बेसुमार वापर केला. आता जमिनीतच नाही तर नळाला कोठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक पाणीबचत करू लागलेत. वाहने धुण्याच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्येही आता पाणीबचत होऊ लागली आहे. जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले असून हॉटेलचालकांप्रमाणेच आता सर्व्हिसिंग सेंटरचालकही या अभियानात सक्रिय झाले आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळे सातारा शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पाणीटंचाईमुळे घरी मोठी वाहने धुणे अवघड झाले आहे. साहजिकच सर्व्हिसिंग सेंटर्समध्ये वाहने धुण्यासाठी रोजच गर्दी असते. मात्र सर्व्हिसिंग सेंटरचालकही आता पाणीबचत करू लागले आहेत. गाडीवर पाणी फवारण्यापूर्वी ओल्या कापडाने अगोदर गाडी पुसून घेतल्यास नंतर पाणी कमी लागते. त्यामुळे शक्यतो आम्ही ही पद्धत वापरत असल्याचे शहरातील सर्व्हिसिंग सेंटरचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सातारा शहरातील विविध सर्व्हिसिंग सेंटरचालकांनी गाड्या धुण्यासाठी वेगवेगळे उपाय योजून कमी पाण्यात वाहने कशी धुता येतील, याकडे लक्ष दिल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
मोटारीचा वेग कमी
सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. अशा स्थितीत पाणीबचत गरजेची आहे. आम्ही वाहने धुताना पाण्याच्या मोटारीचा वेग कमी ठेवतो, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी फवारले जाऊन पाणीबचत होत आहे.
- ओंकार भोसले, सातारा
स्प्रेचा व्हॉल्व्ह बदलला
गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणारा स्पे्र सुस्थितीत असेल तर कमी पाणी फवारले जाते. त्यातील व्हॉल्व्ह व्यवस्थित काम करत नसले तर पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रेशर व्हॉल्व्ह बदलला आहे. यामुळे साधारणपणे चाळीस टक्के पाणीबचत होऊ लागली आहे.
- पप्पू मोहिते, सातारा