सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

By नितीन काळेल | Published: July 17, 2024 07:28 PM2024-07-17T19:28:55+5:302024-07-17T19:29:17+5:30

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा 

Water scarcity in many villages in Satara district even during monsoon; Water supply by tanker to 23 villages, 113 wadis  | सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात हुलकावणीही आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असलातरी अजूनही जिल्ह्यातील २३ गावे आणि ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील सर्वाधिक गावे आणि वाड्या या माण तालुक्यात आहेत. तर वाई, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यातही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झालेली.

परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. तर यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती गडद झाली. त्यामुळे २०० हून अधिक गावे आणि ७१६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. तसेच बहुतांशी ठिकाणी चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत गेली. तरीही जिल्ह्यातील काही भागात अजूनही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजूनही २३ गावे आणि ११३ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १७ गावे आणि ११२ वाड्यांसाठी १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर ४२ हजारांवर नागरिकांची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव आणि वाकी गावांसह वाडीवस्त्यांवर टँकर सुरू आहे. खटाव तालुक्यात टंचाई कमी झाली आहे. सध्या ३ गावे आणि एका वाडीसाठी २ टँकर सुरू आहेत. यावर २ हजार नागरिक आणि ९९६ पशुधन अवलंबून आहे. शिंदेवाडी, नवलेवाडी आणि गारळेवाडी येथे टंचाई आहे.

कोरेगाव तालुक्यात भाडळे येथेच टंचाई आहे. गावातील ३ हजार २७८ नागरिक आणि ३ हजार १४२ पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यातही एकाच गावात पाण्याची भीषण स्थिती आहे. निंबोडीतील २२६ ग्रामस्थ आणि ३५१ पशुधनासाठी टँकर सुरू आहे. वाई तालुक्यातही आनंदपूर येथे टंचाई आहे. याठिकाणीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

४८ हजार नागरिकांसाठी २० टँकर सुरू

जिल्ह्यात सध्या अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या २० टँकरद्वारे सुमारे ४८ हजार नागरिक आणि ४ हजार ६७४ पशुधनाला पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर टंचाई निवारणासाठी ११ विहिरी आणि ३ बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात एक विहीर आणि ३ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

Web Title: Water scarcity in many villages in Satara district even during monsoon; Water supply by tanker to 23 villages, 113 wadis 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.